अकोला : तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथील आईची हत्या करणारा आरोपी पोलिसांनी तीन महिन्यांनंतर २१ जून रोजी पकडला आहे. घटनेनंतर तो फरार होता. प्राप्त माहिती नुसार , आरोपी विनोद समाधान तेलगोटे (३६) याने शेतीचा हिस्सा मिळावा यासाठी आई वडिलांसोबत वाद करून १९ मार्च २०२५ रोजी रात्री कुऱ्हाडीने डोक्यावर घाव घालून जखमी केले होते. उपचारादरम्यान त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो फरार होता.
याप्रकरणी आरोपीचा भाऊ विजय समाधान तेलगोटे यांनी २० मार्च रोजी पोलिसात तक्रार दिली होती. तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी फिर्यादीच्या जखमी आई-वडिलांना तेल्हाऱ्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. डॉक्टरांनी प्रथमोपचारानंतर जखमींना अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारार्थ पाठविले होते. उपचारादरम्यान तक्रारकर्त्याची जखमी आई बेबाबाई उर्फ गोकर्णा समाधान तेलगोटे (५०) यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून आरोपी फरार झाला होता. फरार आरोपीस पो. नि. प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती वरुन पोलिस हवालदार राहुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज कासले यांनी आरोपीस अहमदनगर येथून २१ जून रोजी पकडले.