

Akola Retired Engineer killed in Housing Society Dispute
अकोला: शहरातील रणपिसे नगर येथील मुरलीधर टॉवर संकुलातील रहिवासी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातील सेवानिवृत्त उपअभियंता संजय कौसल यांची सोसायटीच्या वादातून महेंद्र पवार याने डोक्यात टीकासने वार करून त्यांची हत्या केली. ही घटना सोमवार (दि. २) रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पवार याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातील सेवानिवृत्त उपअभियंता संजय कौसल (वय ६२) शहरातील मुरलीधर टॉवर मधील रहिवासी असून याच सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांचा महेंद्र पवार याच्यासोबत सोसायटीच्या कारणावरून जुना वाद होता. सोमवारी रात्री या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
त्यानंतर मारहाणीत पवार याने टॉवरच्या आवारात ठेवलेल्या टीकासने संजय कौसल यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली. कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टीकासने वार केले. जखमी कौसल यांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक जयवंत सातव, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक खरबडे यांनी येऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी महेंद्र पवार यास पोलिसांनी अटक केली.