Congress Leader Hidayat Patel Passes Away Pudhari
अकोला

Akola Crime: अकोल्यात प्राणघातक हल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांनी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Congress Leader Hidayat Patel Passes Away: अकोल्यात झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मशिदीत नमाज आटोपून बाहेर पडत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

Rahul Shelke

Congress Leader Hidayat Patel Passes Away: अकोल्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. काल अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हिदायत पटेल हे मोहाळा गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत असताना त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्यांच्या पोटावर आणि मानेवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना अकोटमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जखमा अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं. अखेर आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी कोण?

प्राथमिक तपासात हा हल्ला राजकीय आणि कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. उबेद पटेल या तरुणाने हा हल्ला केल्याचा संशय असून, घटनेनंतर तो फरार झाला होता. मात्र रात्री पणज गावातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

जुन्या वादाची पार्श्वभूमी

या घटनेला जुनी पार्श्वभूमी असल्याचंही समोर येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोहाळा गावात झालेल्या राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी उबेद हा मतीन पटेल यांचा पुतण्या असल्याची माहिती आहे. याच जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण होते हिदायत पटेल?

हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते मानले जात होते. ते सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते.

राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव होता. ते गेली 25 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. सध्या अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. तसेच अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक अशीही त्यांची ओळख होती.

हिदायत पटेल यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT