अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 53 वर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनाचा पंक्चर टायर बदलत असताना वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने त्याला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याची घटना 24 मे रोजी पहाटे घडली .
प्राप्त माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा गावाजवळ वाहनाचा टायर पंक्चर झाला होता. रस्त्याच्या कडेला वाहन थांबून चौघे स्टेपनी बसवित होते. एव्हडयातच मूर्तिजापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने चौघांना जबर धडक दिली. या अपघातात पवन दिपक वानखडे (वय : २७ वर्षे, रा. सिद्धार्थनगर, बोरगाव मंजू) या युवकाचा मृत्यू झाला.
तो कामानिमित्त कारंजा येथून मूर्तिजापूरमार्गे बोरगाव मंजूकडे परत येत होता. त्याच्यासोबत रोहित गोटमारे, तौफीक शाह व सतीष वानखडे हे देखील होते हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.