अकोला: पुढारी वृत्तसेवा : पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ लाख माहेरहून आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. सासरच्या या छळाला कंटाळून विवाहितेने माहेरी मांजरी येथे पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. जयश्री नागे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर पती आशीष नागे यास अटक केली आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सदस्य असलेल्या सासू सासऱ्याविरोधात उरळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदा रामदास साबळे (वय ४५, रा. मांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ एप्रिल २०२१ रोजी जयश्री हिचा विवाह पैलपाडा येथील आशिष वसंतराव नागे यांच्यासोबत झाला. आशिष शेती करतो, सासरे वसंतराव मारोती नागे हे वंचित बहुजन आघाडी पक्षातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. तसेच त्यांनी अकोला पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून काम पाहिले आहे. तर सासू शोभा नागे सध्या पंचायत समिती सदस्य आहेत.
लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सासऱ्याच्या मंडळींनी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी जयश्रीकडे तगादा लावला होता. त्यामुळे माहेरकडील आर्थिक परिस्थिती ठीक नसतानासुध्दा जयश्री हिने २ लाख ५० हजार रुपये सासरी आणून दिले. मात्र, त्यानंतर तिचा छळ कमी होईल, आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल, असे वाटले होते. परंतु, पुन्हा उर्वरित २ लाख ५० हजार रुपयांसाठी तिचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. दरम्यान, पती आशिष नागे जयश्री माहेरी आलेली असतानासुध्दा मोबाइल फोनद्वारे पैसे आणण्यासाठी धमक्या देत होता. त्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप जयश्रीची आई नंदा साबळे यांनी केला आहे.
याबाबतची तक्रार उरळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. त्यानुसार विविध कलमान्वये सासरच्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर पती आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे.दीर नितीन वसंतराव नागे, नणंद जयश्री सुभाष खराटे आणि वेदांती अनिल पातोंड (रा. टवलार, ता. अचलपूर, जि. अमरावती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जयश्री नागे यांनी सासरकडून होणाऱ्या त्रासाचा सर्व डाटा पेनड्राईव्हमध्ये गोळा केला होता. हा पेनड्राईव्ह माहेरच्या कुटुंबियांच्या हाती लागला. त्यानंतर पेनड्राईव्ह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यातून हा गुन्हा उघड झाला.
मृत जयश्री नागे यांना १० मे २०२२ रोजी मुलगी झाली होती. त्यामुळेही तिचा छळ सुरु होता. एकदा जयश्रीला पती आशिष नागे याने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
हेही वाचलंत का ?