विदर्भ

अमरावती : मध्य प्रदेशातून गुटखा तस्करी करण्यास अटक; आसेगाव पूर्णा पोलिसांची कारवाई

दिनेश चोरगे

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातून येणारा गुटखा पकडण्यात आसेगाव पोलिसांना यश आले. कारमधून गुटखा तस्करी करणाऱ्या एकाला आसेगाव पूर्णा पोलिसांनी गोविंदपूर फाटयावरून अटक करत त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ३ लाख १३ हजार २२५ रूपये किमतीचा गुटखा व कार असा एकूण ८ लाख १३ हजार २२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १९ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आली.

राहुल खाटवाणी (३७, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने हा गुटखा मध्य प्रदेशातील सावलमेंढा येथील अमित राठोड याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. राहुल हा (एम एच ४९, बीबी १८७२) या कारमधून हा गुटखा मध्य प्रदेशातून अमरावतीत चोरमार्गाने घेऊन येत होता. याबाबत शिवजयंती निमित्त गस्तीवर असलेल्या आसेगाव पूर्णा पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

पोलिस चौकशीत राहुलने तो गुटखा अमित राठोड याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार राहुलसह अमित विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे नेमका अमित राठोड कोण, तो अमरावतीला कुणाकुणाला गुटखा पुरवितो. तो अमरावतीत नेमका कुठल्या मार्गाने व कसा आणला जातो, हे जाणून घेण्यासाठी आसेगाव पोलिस मध्य प्रदेशातील सावलमेंढा येथे जाणार आहेत.

                  हेही वाचलंत का ?
SCROLL FOR NEXT