चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांसह राज्य कर्मचारी १४ मार्च पासून संपावर गेले आहेत. परिणामी शाळा ओस पडल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने चिमूर तालुक्यातील आंबोली येथील जिल्हा प्राथमिक शाळेत सरपंच व उपसरपंच विद्यार्थ्यांना शिक्षवत आहेत.
राज्यभरात शिक्षकांसह विविध आस्थापनावरील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांची कामे खोळंबली आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील झालेला आहे. शाळा ओस पडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची शिक्षणाची लय तुटत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आंबोली ग्रामपंचायतने पुढाकार घेतला. आंबोली जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकही संपावर गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरपंच शालिनी दोतरे व उपसरपंच वैभव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. १४ मार्चपासूनच त्यांनी शाळा सुरू केली आहे. सरपंच व उपसरपंच शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांना गावातील काही तरुण तरुणींची जोड मिळाली आहे.
आंबोली हे तीन हजार लोकवस्तीचे गाव असून, गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेत अडीचशे विद्यार्थी आहेत. गावातीलच उच्च शिक्षित युवकांची सभा घेऊन जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही, तोपर्यंत सर्वांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :