नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शेजारच्या राज्यांमधून नागपूरमार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची बाब पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईतून उघड झाली आहे. ओडिशातून नागपूरमार्गे मराठवाड्यात बीडच्या दिशेने जात असलेला १५०० किलो गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. अंमली पदार्थाच्या बाजारात या गांजाची किंमत १ कोटी रुपयांच्या वर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.१६) कापसी परिसरात ही कारवाई केली.
दरम्यान, या प्रकरणातील पुरवठादार, वाहतूकदार, माल स्वीकारणारे तसेच ग्राहक या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एक चमू कामाला लागल्याची माहिती नागपूर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप येत असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी विशेष प्रशिक्षित श्वानाच्या मदतीने या ट्रकची तपासणी केल्यावर यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. तब्बल पन्नास पोत्यांमध्ये हा गांजा आढळून आला. नागपूर पोलिसांनी बीड पोलिसांना सतर्क केल्यावर तेथे दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वी तस्करांकडून रेल्वेचा वापर करण्यात येत होता. मात्र, रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याने हल्ली रस्ते मार्गाचा वापर जोरात आहे. याच प्रकारच्या कारवाईत ऑक्टोबरमध्ये नागपूर पोलिसांनी शंभरपेक्षा जास्त जणांवर कारवाई करीत २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.