Youth Ended Life
डोंबिवली : मैत्रिणीशी झालेल्या भांडणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या २१ वर्षीय तरूणाने अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपुष्टात आणले. ही धक्कादायक घटना पश्चिम डोंबिवलीतील सुदामा सोसायटीत घडली. ऋषिकेश शर्विल परब (२१) असे जीवन संपविलेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर तो राहत असलेल्या राहूल नगर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पश्चिमेकडील वंदे मातरम् कॉलेजचा विद्यार्थी ऋषिकेश परब याचा मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेतला. त्याच्या इमारतीवरून उडी मारतानाचे दृश्य पाहून परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली आहे. ऋषिकेश परब हा सदर इमारतीतील पाचव्या मजल्यावर राहत होता. ऋषिकेश राहत असलेल्या सोसायटीत सकाळी ८ वाजल्यापासून बसलेला होता. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या ऋषिकेशने थेट अकराव्या मजल्यावर जाऊन तेथील फायर डकमधून उडी घेतली. सकाळी ११.४६ वाजता या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर काही वेळातच दुपारी १२ च्या सुमारास ऋषिकेशने उडी घेतली. जमिनीवर आदळल्यामुळे डोक्यास जबर दुखापत होऊन ऋषिकेशने जागीच गतप्राण झाला. हा सारा प्रकार समोरच्या इमारतीतील रहिवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला.
ऋषिकेश वंदे मातरम् कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. घटनेनंतर विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ऋषिकेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात पाठवून दिला. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.