डोंंबिवली : पश्चिम डोंंबिवलीत उन्मत्त फेरीवाल्यांनी धुडगूस घातला आहे. खवय्या डोंबिवलीकरांच्या पोटात उमदाळून येईल, असा प्रकार एका जागरूक महिलेने चव्हाट्यावर आणला आहे. स्टेशन परिसरात असलेल्या एका नामचिन वडा-पाव विक्रीच्या दुकानातील चटणीमध्ये या महिलेला चक्क वळवळणाऱ्या जिवंत अळ्या आढळून आल्या. गुरूवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अशा दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
एका कष्टकरी महिलेने सदर दुकानातून वडा-पाव विकत घेतला. त्यातील चटणीमध्ये वळवळणाऱ्या जिवंत अळ्या आढळून आल्यानंतर या बाबतची तक्रार वडा-पाव विक्रेत्याकडे केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव यांना हा प्रकार समजताच त्यांनी कसारा भागातून दिवाळी निमित्त काही वस्तू विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलेची भेट घेतली.
या महिलेने तिच्या जवळील वडा-पाव आणि त्यामधील चटणी सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव यांना दाखवली. त्यावेळी त्या चटणीमध्ये अळ्या असल्याचे, तसेच ती चटणी शिळी देखिल असल्याचे काशीबाई जाधव यांच्या निदर्शनास आले. कसारा, खर्डी, शहापूर परिसरातून अनेक महिला दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आंब्याची पाने, केळीची पाने, झेंडु, आंबे फुलांची तोरणे विक्रीसाठी घेऊन येतात.
या महिला दिवस-रात्र जंगलात कष्टाची कामे करून सणासुदीच्या दिवसात शहरी भागात वस्तू विक्रीसाठी नेल्या तर पैसे मिळतील म्हणून येतात. त्यांच्याजवळ जेवणाचा डबा नसतो. वडा-पाव खाऊन त्या दिवस काढतात, असे काशीबाई जाधव यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांची पाठ फिरताच दुकान सुरू
काशीबाई जाधव यांनी त्या कष्टकरी महिलेला केडीएमसीच्या ह प्रभाग कार्यालयात नेले. तेथे या कष्टकरी महिलेने वडा-पावमध्ये अळ्या असल्याची तक्रार केली. पालिकेच्या अधिकाऱ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या दुकानदाराला समज दिली आणि त्या दुकानदाराचे शटर कारवाईसाठी बंद केले. हा प्रकार कळताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानातून वळवळणाऱ्या अळ्या मिश्रित चटणी व अन्य खाद्य पदार्थ ताब्यात घेतले. अधिकारी निघून गेल्यावर दुकानदाराने पुन्हा दुकान उघडून वडा-पाव विक्री सुरू केली. अशा प्रकारचे वडा-पाव खाऊन कुणा खवय्याला बाधा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव यांच्या विचारला. संबंधित वडा-पाव विक्रेत्या दुकानावर कारवाईची मागणी खवय्यांनी लावून धरली आहे.
केडीएमसीचे अधिकारी जबाबदारी घेतील का?
कसारा भागातून एक महिला गुरूवारी सकाळी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात फुलांची तोरणे विक्रीसाठी घेऊन आली. दुपारच्या वेळेत त्यांनी रेल्वे स्थानकाजवळील एका प्रसिध्द वडापावच्या दुकानातून वडा-पाव खरेदी केला. वडा-पाव खात असताना संशय आला म्हणून त्यांनी वडा-पाव हातात घेऊन पाहिले तर पावाला लावलेली चटणी शिळी आणि त्यावर वळवळणाऱ्या अळ्या फिरत असल्याचे आढळून आले. या अळ्या पोटात जाऊन या कष्टकरी महिलेला काही इजा झाली असती तर त्याची जबाबदारी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी घेतली असती का ? असा सवाल काशीबाई जाधव यांनी या संदर्भात बोलताना उपस्थित केला.