

सापाड : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे झपाट्याने पसरत आहे. शहराला खड्डेमुक्त आणि टिकाऊ रस्ते मिळावेत म्हणून हे काम सुरू असले तरी, या कामात गंभीर नियमभंग आणि मनमानी कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाले आहे. विशेषतः कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज परिसरात ठेकेदारांकडून सुरू असलेल्या रस्ते कामात तांत्रिक आणि प्रशासकिय नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिमेंट काँक्रीट रस्ते बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाइन बाजूला घेणे गरजेचे आहे. कारण, भविष्यात पाईपलाइन फुटल्यास, लिकेज झाल्यास किंवा बदलण्याची वेळ आल्यास, पुन्हा तोच काँक्रीट रस्ता फोडावा लागतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जातो आणि नागरिकांचे हाल होतात. मात्र, बिर्ला कॉलेज परिसरात ठेकेदारांनी हे मूलभूत नियोजनच वाऱ्यावर सोडले आहे. रस्त्याखाली असलेल्या जुन्या पाईपलाइनवरच थेट सिमेंट काँक्रीटचे थर ओतले जात आहेत. भविष्यात या पाइपलाइनमध्ये गळती झाल्यास संपूर्ण काँक्रीट रस्ता खोदावा लागणार आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदारांकडून हे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीशिवाय सुरू आहे. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देण्याची तसदी न घेतल्यामुळे ठेकेदारांना नियमबाह्य काम करण्याची मुभा मिळाली आहे. हे ठेकेदार आपल्याच मनाने काम करत आहेत. ना तपासणी, ना मोजमाप, ना तांत्रिक मानके करत आहेत. महापालिकेचे अधिकारी देखरेख करत नाहीत. त्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय सुरू आहे,” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांच्या मते, काँक्रीट रस्त्याचे आयुष्य साधारण 25 ते 30 वर्ष असते. परंतु, जर रस्त्याखालील जुनी पाईपलाइन बदलली गेली नाही, तर भविष्यात ती फुटल्यास रस्ता खोदावा लागतो, ज्यामुळे पुन्हा दुरुस्तीचा मोठा खर्च येतो. हे काम आधी नियोजन करून झाले पाहिजे. पाईपलाइन बाजूला घेऊन, नंतर काँक्रीट टाकले पाहिजे. पण इथे उलटे चालले आहे. भविष्यात हा रस्ता फोडावा लागल्यास नागरिकांचे आणि महापालिकेचे दोघांचेही नुकसान होणार आहे, असे मत पाणीपुरवठा विभागातील निवृत्त अभियंत्यांनी व्यक्त केले. या प्रकाराबद्दल स्थानिक नागरिक नीलेश शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर समाजसेवक संतोष राजपूत, शैलेश महाजन, आणि राहुल केने यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. बिर्ला कॉलेज परिसरातील या नियमबाह्य कामामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “ज्या ठेकेदारांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले, त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे. अन्यथा असे प्रकार पुन्हा घडतील,” अशी नागरिकांची मागणी आहे. काही सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कुणीही प्रतिक्रिया दिली नाही.
दोषी ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
बिर्ला कॉलेज परिसरातील काँक्रीट रस्त्याचे काम तातडीने थांबवावे. पाईपलाइन हलवून पुन्हा योग्य रितीने काम सुरू करावे. दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. महापालिकेने सर्व चालू काँक्रीट रस्त्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक समिती नेमावी. शेवटी, बिर्ला कॉलेज परिसरातील हा प्रकार केवळ एका रस्त्याचा प्रश्न नाही, तर संपूर्ण कल्याण-डोंबिवलीतील विकास कामांमधील बेफिकिरी आणि भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे. शहराला टिकाऊ विकास हवा असेल, तर अशा ठेकेदारांवर आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. नागरिक आता जागे झाले आहेत आणि या वेळी, आवाज दाबण्याऐवजी आंदोलन उभे करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
ही जनतेच्या पैशांची उधळण आहे. रस्त्याखाली पाईपलाइन ठेवून काँक्रीट ओतणे म्हणजे भविष्यातील संकटाला निमंत्रण देणे. महापालिकेने तात्काळ कारवाई केली पाहिजे.
संतोष राजपूत,स्थानिक नागरिक
पाईपलाइन हलविण्याशिवाय काँक्रीट टाकणे म्हणजे तांत्रिक गुन्हा आहे. आम्ही संबंधित ठेकेदाराविरोधात लेखी तक्रार दाखल करू.
शैलेश महाजन, वाहन चालक
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरात वारंवार असे प्रकार घडतात. या वेळी नागरिक गप्प बसणार नाहीत. आम्ही आंदोलन करून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करू. नागरिकांकडून ठेकेदाराला ‘काळ्या यादीत’ टाकण्याची मागणी केली आहे.
राहुल केणे, स्थानिक नागरिक