

मुंबई : सांताक्रुझ येथे पत्नीसह अल्पयीन मुलीला तिच्या पित्याने मारहाण केली. या मारहाणीत आशागरी या मुलीचा मृत्यू झाला तर तिची आई नासिमबानो ही जखमी झाली आहे. तिच्यावर व्ही. एन देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सुलेेमान हुजेरा या आरोपी पित्याविरुद्ध वाकोला पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीनंतर सुलेमान हा पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
सुलेमान हा त्याची पत्नी नासिमबानो आणि मुलगी आशागरी यांच्यासोबत सांताक्रुझ येथील कालिना, शिवनगर परिसरात राहत असून तो पेंटर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री त्याच्या घरी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात त्याने त्याच्या पत्नीसह मुलीला बेदम मारहाण केली होती. त्यात त्या दोघीही जखमी झाल्या होत्या. मारहाणीनंतर सुलेमान हा पळून गेला होता.
सकाळी हा प्रकार स्थानिक रहिवाशांना समजला, त्यामुळे त्यांनी वाकोला पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी दोघींनाही तातडीने जवळच्या व्ही. एन देसाई रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचारादरम्यान आशागरी हिचा मृत्यू झाला तर नासिमबानोवर उपचार सुरु आहे. गुरुवारी रात्री उशिरा सुलेमानविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.