ठाणे : पालघरचा कायापालट करण्याचे काम शिवसेना करीत असून आगामी काळात मुंबईतील समुद्रातील वरळी ते वर्सोवा सीलिंक महामार्ग हा भाईंदर- विरारमार्गे पालघरपर्यंत नेणार असल्याची घोषणा शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला.
पालघर जिल्ह्यातील शिवसेना उबाठा गटाच्या महिला पदाधिकारी, माजी सभापती यांच्यासह अनेक महत्वाच्या उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघरच्या उबाठा महिला जिल्हा संघटक नीलम म्हात्रे, तालुका प्रमुख माजी सभापती मनीषा पिंपळे यांच्यासह माजी सभापती, सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी नामदार शिंदे यांनी 'उबाठाला लागली घर घर, खाली झाले पालघर' असा उबाठाच्या नेत्यांना टोला लगावत खऱ्या शिवसेनेत येण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले.
पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. दिवंगत आनंद दिघे यांनी पायाला भिंगरी लागून शिवसेना वाढविली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारावर आपण चाललो आहोत आणि राज्यभरातील उबाठाचे अनेक पदाधिकारी प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार डॉ. श्रीनिवास वनगा, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे उपनेते राजेश शहा सुशील वैदही वाढण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.