

ठाणे : ठाणे कोपरी परिसरातून नवी मुंबईला जाण्यासाठी नियोजित असलेल्या कोपरी ते पटनी या पुलाच्या कामाला आता गती आली आहे. हा प्रकल्प एमएमआरडीएच्या वतीने राबवण्यात येत असला तरी प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी ही ठाणे महापालिकेवर ठाणे महापालिकेने लवकरात लवकर भुसंपादन करून द्यावी, असे पत्र एमएमआरडीएच्या वतीने ठाणे महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्तरावरही आता भूसंपादनाच्या हालचालीना वेग आला आहे.
एमएमआरडीएच्या वतीने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांची आखणी करण्यात आली असून काही कामे ही प्रगतीपथावर आहेत. यातीलच एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोपरी ते पटनी या पुलाच्या कामाला आता खर्या अर्थाने वेग आला आहे.
ठाण्यातील कोपरी परिसरातून विटावा मार्गे ठाणे बेलापूर मार्गे नवी मुंबईला जाण्यासाठी बराच वळसा घालून जावे लागत होते. हा द्राविडी प्राणायाम होऊन नये यासाठी कोपरी ते पाटणी या उड्डाणपुलाचे नियोजन एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे. या कामासाठी सुरुवातीला एमएमआरडीएच्या वतीने 333 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाला म्हणावी तशी गती मिळाली नव्हती.
कोपरीमधून नवी मुंबईला आणि नवी मुंबईमधून कोपरी जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही. जर नवी मुंबई मधून कोपरीला आणि कोपरीमधून नवी मुंबईला जायचे असेल, तर कळवा नाक्यावर आल्याशिवाय वाहन चालकांना पर्याय नाही. विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पूल करावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील केली होती.
सुरुवातीला हा प्रकल्प ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार होता. मात्र ठाणे महापालिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरेसा निधी नसल्याने हा प्रकल्प अखेर एमएमआरडीएच्या वतीने राबवण्यात यावा, अशा सूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्यानंतर या प्रकल्पाचा सर्व खर्च एमएमआरडीएच्या वतीने उचलण्यात यावा हे निश्चित करण्यात आले.
गेल्या आठवड्यात एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पत्र दिले असून या प्रकल्पासाठी लागणारे भूसंपादन लवकरात लवकर करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने देखील या कामाला गती देत सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिका काय करणार ?
सुरुवातीला प्लॅन टेबल सर्व्हे करणार
सीआरझेडमध्ये किती क्षेत्र येत आहे, याचे सर्व्हेक्षण करणार
किती क्षेत्र बाधित होणार याचे सर्व्हेक्षण करणार
सर्व प्रकारच्या पर्यावरणीय परवानग्या घेणे
असा आहे कोपरी पटनी पूल...
कोपरी खाडी पूल हा 1 किमीचा असणार आहे. यामध्ये 0.600 किमी खाडी पूल, तर 0.400 किमी रास्ता असणार आहे. येण्याजाण्यासाठी प्रत्येकी तीन अशा सहा मार्गिका या पुलावर असणार आहे. या पुलामुळे कोपरीमधून नवी मुंबईला आणि नवी मुंबईमधून कोपरीला थेट जाणे शक्य होणार आहे.