

We will keep our promise of farmer loan waiver: Eknath Shinde
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : महायुतीचे सरकार हे शब्द पाळणारे सरकार आहे. दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहेत. शेतकरी कर्जमाफीचा शब्दही निश्चितपणे पाळला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.८) दिली.
शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे, संजना जाधव, विलास भुमरे तसेच माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत आदींची उपस्थिती होती.
एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती सरकारने भरभरून निधी दिला. त्यातून असंख्य विकासकामे झाली. मी कोणत्याही प्रस्तावावर सही करायला मागेपुढे पाहत नाही. प्रस्तावावर सही करण्यामागे माझा हेतू फक्त त्या गावाचा विकास असतो. म्हणूनच शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री सहायता निधी यासारख्या उपक्रमांमधून हजारो लोकांचे जीव वाचवले. सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली.
विरोधकांनी त्यावर टीका केली. म्हणाले ही योजना बंद पडणार, पण तसे झाले नाही. ही योजना कधीही बंद होणार नाही. ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी ठरली आहे. बचतगट, लघुउद्योग, छोटे व्यवसाय, घरगुती उद्योग यातून माझ्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. कुणी स्टॉल सुरू केला, कुणी व्यवसाय, तर कुणी क्रेडिट सोसायटी उभी केली. अशा प्रकारे या योजनेमुळे अनेक महिला उद्योगपती होत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. आपण निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळणारे आहोत. लोक शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारतात. आम्ही टप्प्याटप्प्याने शब्दपूर्ती करत आहोत. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासनही नक्कीच पूर्ण केले जाईल, असेही शिंदे म्हणाले.
अंशी टक्के कामे एक रुपयाही न घेता दिली : रमेश बोरणारे
वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी गेल्या अडीच वर्षांत मतदारसंघासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे नमूद केले. या निधीतील कामे देताना कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले. शंभर कोटींची कामे असतील तर त्यातील ८० कोटींची कामे एक रुपयाही न घेता आपल्या कार्यकर्त्यांना दिली, असे बोरणारे म्हणाले. कार्यकर्त्यांमुळे आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांना विसरून चालणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी मेहनत घेणार असल्याचेही बोरणारे म्हणाले.