नेवाळी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरणासाठी बुधवारी स्त्रीशक्ती रस्त्यावर उतरली.
भूमिपुत्रांनी उभारलेल्या या विराट आंदोलनाला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यातील आगासन गावात महिलांची विशेष सभा पार पडली आहे. गावातील विविध पाड्यांतून निघालेल्या जनअक्रोशाने परिसर पेटून उठला होता. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावोगाव जनजागृती करत आगामी मोर्चासाठी कणा मजबूत करण्याचे काम हाती घेतले आहे.
भिवंडीसह कल्याण डोंबिवली सह परिसरातील भूमिपुत्र या पायी दिंडीत लक्षणीय सहभाग घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता भूमिपुत्रांची महिला शक्ती देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी करत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दिले होते. या नामकरणासाठी अनेक आंदोलन भूमिपुत्रांनी केली आहेत. मात्र आश्वासनांच्या पलीकडे भूमिपुत्रांच्या पदरात काही पडलेच नाही. त्यामुळे 22 डिसेंबरपासून भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ अशी पायी यात्रा निघणार असून या यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय राहणार आहे.
आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा सहभाग वाढवण्याचे धोरण यावेळी बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. “विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नावहा भावनांचा प्रश्न असून भूमिपुत्रांच्या अस्मितेची ही लढाई आहे,” अशा शब्दांत महिलांनी आपली भूमिका ठाम केली. दिवा, डोंबिवली, भोपर, कल्याण, श्री मलंगगड परिसरातील महिला कार्यकर्त्या गेल्या काही दिवसांपासून सतत जनसंपर्कात असून घराघरातून महिलांना यात्रेत सहभागी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मोहीम अधिक व्यापक होणार
दरम्यान, या आंदोलनासाठी भूमिपुत्रांच्या डोंबिवली विभागाकडून व्यापक पातळीवर तयारी सुरू आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यातील भूमिपुत्र या पायी यात्रेत उतरतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली आहे. महिलांच्या सक्रीय सहभागामुळे ही मोहीम आणखी व्यापक आणि प्रभावी होणार असल्याचे स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे आहे. गावोगावचे वातावरण आता पूर्णपणे आंदोलनमय झाले असून आगामी विराट मोर्च्याला महिलांची उपस्थिती आंदोलनाला निर्णायक रूप देणार हे स्पष्ट झाले आहे.