

नेरळ ः कर्जत - मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर कर्जत चारफाटा येथील मध्य रेल्वेवरील असलेल्या अरुंद क्रॉसिंग ओव्हरक्रॉस ब्रिजमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी व होणारे दैनंदिन हाल सहन करावे लागते. अनेक वर्षांपासून या ओव्हरक्रॉस ब्रिजच्या रुंदीकरणाच्या लोकांमधून होणाऱ्या मागणी संदर्भात भाजपाचे कर्जत - खालापूर विधानसभा मतदार संघाचे संर्पक प्रमुख किरण ठाकरे यांनी पुढाकार घेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मांगणीचे निवेदन हे सादर केले आहे.
निवेदनात किरण ठाकरे यांनी कर्जत शहरातून जाणाऱ्या कर्जत - मुरबाड एनएच 548 ए या मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या मध्य रेल्वे ओव्हरक्रॉस ब्रिजची जीर्ण झालेली अवस्था व असलेली अरूंद स्थिती त्यामध्ये वाढते शहरीकरण तसेच नागरिकरण त्यामध्येच मोठया अवजड व छोट्या मोठया वाहनाची वाढती संख्या पाहाता कर्जत चारफाटा येथे नागरिकांवर मोठया प्रमाणात होणारा या वाहतुक कोडींच्या परिणामाचे विवरण केले आहे.
ओव्हरक्रॉस ब्रिजच्या अरुंदपणा व त्यामुळे रोजच्या प्रवासातील होणारा अडथळा तसेच सकाळ- संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी लांबच लांब लागणाऱ्या वाहनांच्या रांगा तसेच अवजड वाहनांना क्रॉसिंग देताना येणारे अडथळे, वारंवार होणारे अपघात, तसेच आपत्कालीन सेवांना मार्ग उपलब्ध न होण्याची समस्या संदर्भातील परस्थिती ही किरण ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी निदर्शनास आणून दिले.
किरण ठाकरे यांची बाजू व निवेदनातील मुद्दे जाणून घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य मान्य करत ओव्हस्क्रॉस ब्रिज रुंदीकरणासाठी तातडीने उपाययोजना केले जाईल असे सकारात्मक आश्वासन देत संबंधित विभागाकडून तांत्रिक अहवाल मागवून आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश हे देण्याचे संकेत दिले आहे. तर कर्जत परिसरातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी सतत पाठपुरावा करत राहणार व नागरिकांचा त्रास कमी करणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हीच माझी प्राथमिकता असल्याचे किरण ठाकरे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.