Unauthorized Entry In Ladies Coach
डोंबिवली : एकीकडे पुरूष फेरीवाल्यांची घुसखोरी, तर दुसरीकडे मोठमोठ्याने चकाट्या पिटत अश्लील अंगविक्षेप करत जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या किन्नरांमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. अशा उपद्रवींना वठणीवर आणण्यासाठी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. महिलांच्या डब्यांत घुसखोरी करणाऱ्या पुरूष फेरीवाल्यांसह किन्नरांची धरपकड मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अनेक पुरूष फेरीवाले सकाळच्या सुमारास लोकल डब्यात प्रवाशांची खचाखच गर्दी असते म्हणून सुरक्षित प्रवासासाठी वस्तू विक्रीच्या नावाखाली महिलांच्या डब्यात घुसतात. वस्तू विक्रीच्या नावाखाली ठाणे, घाटकोपर, कुर्ल्या पर्यंत प्रवास करतात. डबा महिला प्रवाशांनी खचाखच भरलेला असतो. तरीही गर्दीतून वाट काढत पुरूष फेरीवाले वस्तू विक्री करत डब्यातून फिरत असतात. अशा फेरीवाल्यांना अनेक प्रवासी महिला डब्यात चढण्यास मज्जाव करतात. पण त्यांना दाद दिली जात नाही. पुरूष फेरीवाल्यांपेक्षा तृतीयपंथी (किन्नर) उपद्रवी ठरू लागले आहेत. पुरूषांच्या डब्यांत घुसखोरी करणाऱ्या किन्नरांनी महिला प्रवाशांच्याही नाकी दम आणला आहे. गर्दीच्या वेळेत पुरूष फेरीवाल्यांसह किन्नरांचा महिला प्रवाशांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांना तक्रार केली तर पोलिसांकडून आपले नाव जाहीर होईल. आपल्याला त्रास होईल या भीतीने कुणीही अशांच्या तक्रारी करण्यास धजावत नाही. डोंबिवली स्थानकात महिलांच्या डब्यातून पुरूष फेरीवालेच नव्हे तर आता किन्नरही प्रवास करू लागल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
गुरूवारी सकाळी या संदर्भात एका प्रवासी महिलेने आरपीएफ/जीआरपीच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर गंभीर तक्रार फोटो/व्हिडियोसह दाखल केली. किन्नरांकडून सकाळी कल्याण दिशेकडील लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना त्रास दिला जातो. अशा तक्रारी सातत्याने येत असतात. त्यामुळे सुरक्षेची जबाबदारी म्हणून डोंबिवली आरपीएफने या तक्रारीची दखल घ्यावी, याकडे सदर महिलेने जबरदस्तीने पैसे उकळण्यासाठी अश्लील अंगविक्षेप करणाऱ्या एका किन्नराचे फोटो/व्हिडीओद्वारे लक्ष वेधले. याची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे सुरक्षा बलाने या किन्नरला अवघ्या अर्धा/पाऊण तासांत ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर दुसरीकडे डोंबिवली ते मुंब्रा स्टेशन दरम्यान महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या चौघा पुरूष फेरीवाल्यांवर देखिल कारवाई केली. या पाच जणांच्या विरोधात भारतीय रेल्वे कायद्याचे कलम १४४ आणि १६२ अन्वये कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे सुरक्षा बलाकडून सांगण्यात आले.
महिलांच्या डब्यांत पुरूष फेरीवाले आणि किन्नर प्रवास करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींना अनुसरून प्रतिबंधकात्मक कारवाया करण्यासाठी सकाळपासून डोंबिवली लोकलसह इतर लोकलच्या महिला डब्यात फेरीवाले आहेत का याची तपासणी रेल्व सुरक्षा बलाचे जवान आणि लोहमार्ग पोलिस करत होते. अशा प्रकारची तपासणी नियमित करण्याची मागणी महिला प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे केली. यापूर्वी अनेकदा पुरूष फेरीवाल्यांची गर्दीच्या वेळेत महिला डब्यातील प्रवासाविषयी रेल्वेच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. कारवायांमध्ये सातत्य कायम ठेवावे, अशी अपेक्षा उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केली.