वाडा : मच्छिंद्र आगिवले
वाडा ग्रामीण रुग्णालय आधीच समस्यांनी ग्रस्त असतांना शेकडो गरोदर मातांचा आधार असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलांच्या तपासणी दरम्यान एका संघटनेने प्रचंड गदारोळ केला, ज्यादरम्यान स्त्रीरोग तज्ञांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील या प्रकाराचा निषेध नोंदविला असून कारवाई करा अन्यथा कामबंद आंदोलन पुकारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयाची क्षमता अवघी 30 खाटांची असूनही जवळपास अडीच लाख रुग्णांना ते सेवा देत असून 300 हून अधिक बाह्य तर अनेकदा 100 आंतररुग्णांना येथे दररोज सेवा दिली जाते. स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे खरेतर शेकडो महिलांना मोफत सेवा मिळते. ग्रामीण रुग्णालयात महिन्याला जवळपास 100 प्रसूती होत असून अनेकदा गुंतागुंतीच्या वेळी 30 ते 40 महिलांचे सिझर प्रसूती देखील येथेच होते. गोरगरिबांची यामुळे लाखो रुपयांची बचत होतेच शिवाय खाजगी रुग्णालयात होणारी पिळवणूक व जीव धोक्यात घालून करावा लागणार शहराचा प्रवास यातून सुटका देखील होते. मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांची तपासणी सुरू असून जवळपास 70 ते 80 महिला तपासणीसाठी उपस्थित होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञ महिलांची तपासणी करीत असताना अचानक रांगेत असणाऱ्या एका महिलेची प्रकृती बिघडून तिला चक्कर आली. तातडीने या महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र एका संघटनेने कार्यकर्त्यांना गोळा करून मोठा राडा केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. स्त्रीरोग तज्ज्ञ अधिकाऱ्यांना यावेळी विनाकारण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून याप्रकाराने खिन्न होऊन स्त्रीरोगतज्ज्ञांनी पदाचा राजीनामा दिल्याचे अधीक्षक डॉ. यादव शेखरे यांनी सांगितले.
वाडा ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलांना मिळणारे मोफत उपचार खरेतर शहरातील अन्य खाजगी रुग्णालयांच्या डोळ्यात खुपत असून यामुळे त्यांची मोठी आर्थिक गणिते बिघडून उलट गोरगरिबांना मात्र मोठा दिलासा मिळत आहे. सरकारी रुग्णालयातील याच सुविधा बंद करण्याचा हा कुटिल डाव तर नाही ना अशी शंका अनेकांनी उपस्थित केली असून याविरोधात रुग्णालय प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
गदारोळ करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी अन्यथा काम बंद आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका रुग्णालय कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे. संबंधित संघटनेच्या तालुका अध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता आम्ही डॉक्टरांना त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली मात्र कोणतीही शिवीगाळ केली नाही, असे सांगत त्यांनी आरोप फेटाळले आहेत.