वाडा (पालघर) : पालघर जिल्ह्यातून नाशिककडे जाण्यासाठी वाडा ते खर्डी मार्गे प्रवास करणे अनेक वाहनचालक पसंत करतात. निशेत गावाच्या पुढे मात्र घाट रस्त्यावर मात्र अत्यंत खराब रस्त्याचा सामना प्रवाशांना करावा लागतो. वनविभागाची अडचण सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग आपले हात वर करतात तर वन विभाग मात्र आपली कोणतीही अडचण नाही असे सांगून आपली बाजू मांडतात. एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या नादात वाहनचालक मात्र मेटाकुटीला आले असून अनेकांवर गाड्या पुढे सरकत नसल्याने पायपीट करण्याची नामुष्की ओढवते.
वाडा ते सोनाळे मार्गे खर्डी मार्ग नाशिक महामार्गाला जोडणारा महत्वाचा दुवा असून जुन्या व सुरक्षित मार्गाला वाहनचालकांची चांगली पसंती मिळते. मागील वर्षापासून मात्र या रस्त्यावरील निशेत घाटात मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. काही टप्प्यात रस्ता इतका भयानक आहे की ज्यावर वाहने पुढे जाणे अशक्य बनते. दैनिक पुढारीने उन्हाळ्यात याबाबत वनविभाग, स्थानिक आमदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रतिक्रिया घेऊन मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र ढिसाळ यंत्रणा अजूनही जागी न झाल्याने वाहनचालक संकटात सापडले आहेत.
टोल व वेळ वाचविण्यासाठी अनेकदा ट्रक व अवजड वाहने याच मार्गावरून वळविली जातात ज्यामुळे आधीच अडचणीचा प्रवास अधिक धोकादायक बनला आहे. कार सारखी लहान वाहने देखील चालविणे जिकिरीचे बनले असून गाड्या चालत नसल्याने पायपीट करण्याची वेळ येत आहे. तात्काळ याबाबत कारवाई होणे गरजेचे असून प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
निशेत गावाच्या पुढे असणार्या घाटात मार्गाची अवस्था दोन वर्षांपासून बिकट असून हद्दीच्या वादात हा मार्ग रखडल्याने आम्हाला गाड्या चालविणे बिकट झाले आहे. अर्धा किमी अंतर चालत वर जाण्याची नामुष्की आमच्यावर ओढवत असून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी. - योगेश कोर, स्थानिक रहिवाशी.