वाडा-भिवंडी महामार्ग कितीहीखराब व जीवघेणा झाला तरी लोकांच्या नशिबात असणारा दैनंदिन प्रवास काहीकेल्या संपणारा नाही. मागील १५ वर्षांपासून या महामार्गाची अवस्था दयनीय असून अनेक सरकारबदलली मात्र महामार्ग आपली निकृष्टपणाची ओळख धरून आहे हे दुर्दैव आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसह विविध मुद्यांवर नुकताच रास्तारोको आंदोलन झाले मात्र तब्बल १२ तासांच्या तपश्चर्येनंतरही रस्त्याची अवस्था जैसे थे असल्याने जनता हवालदिल झाली आहे.
वाडा ते भिवंडी हा महामार्ग निम्मे पालघर जिल्ह्याची प्रमुख लाइफलाइन असून मुंबई, कल्याण, नाशिक, पनवेल व पुढे अनेक शहरांशी जोडण्यासाठी हा महामार्ग महत्वाची भूमिका बजावतो. मागील १५ वर्षांपासून या महामार्गाची प्रतिष्ठा एखाद्या पायवाटेप्रमाणे झाली असून या महामार्गावर खराब रस्त्यामुळे शेकडो लोकांचा बळी तर हजारो लोकं जखमी झाली आहेत. एका कंपनीने या पूर्ण मार्गाला महामार्ग बनविण्याचा प्रयत्न केला मात्र जवळपास १३ वर्षात या मार्गाची अवस्था काही सुधारली नाही.
८०० कोटी रुपयांचा निधी देऊन सध्या एक कंपनी या मार्गाचे काँक्रीटीकरण करून त्याला पुन्हा महामार्गाचे रूप देण्यात व्यस्त आहे मात्र त्यांचेही काम हवेतसे वेगवान नसल्याने यावर्षी जनता पुन्हा रस्त्याचे चटके सहन करीत आहे. काही संघटनांनी नुकताच काही मुद्यांसाठी महामार्गाला अनेक ठिकाणी रोखून रास्तारोको आंदोलन केले. प्रश्न जनतेच्या हिताचा असल्याने लोकांनीही १२ तास हाल सोसून सहकार्य केले मात्र त्यानंतरही आंदोलकांच्या मागण्या केराच्या टोपलीत पडल्याचे पाहायला मिळत आहे.
गांधरे गावापासून एकेरी कॉक्रिट रस्त्यावरून सध्या सुरू असलेली वाहतूक काहीसा दिलासा देत असली तरी पुढे या मार्गाची अवस्था भीषण असून एका बाजूने मात्र कोणतीही दुरुस्ती होत नसल्याने आंदोलनांना दिलेल्या आश्वासनांचे काय असा सवाल विचारला जात आहे. बलाढ्य संघटना व आंदोलनाची जिथे डाळ शिजत नाही तिथे सामान्य जनतेने कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न लोकांना पडला आहे. शिरीषपाडा ते कांवारे मार्गे वाशिंद व खानिवली मार्गे गोहेफाटा अशा अनेक पर्यायी मार्गांची अवस्था दयनीय असून वाडा तालुक्यात दळणवळणाची झालेली कोंडी अतिशय अन्यायकारक व संतापजनक असल्याचे बोलले जात आहे.