मुंब्रा : प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या मार्गिकेत बोगस घरे उभारून शासनाचा लाखो रुपयांचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या घोटाळा प्रकरणात पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी आणखी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची एकूण संख्या २४ वर पोहोचली आहे. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती आगामी काळात अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसई पूर्वेतील कामण, सारजामोरी आणि पोमण या गावांमधून विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉर आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाणार आहेत. या प्रस्तावित महामार्गाच्या जागेवर शासकीय मोबदला लाटण्याच्या उद्देशाने सुमारे २ हजार अनधिकृत घरे उभारण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही सर्व अनधिकृत बांधकामे अलीकडेच जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात ही घरे २०२२ आणि २०२३ मध्ये बांधण्यात आली होती; मात्र, शासकीय मोबदला मिळावा यासाठी त्यांना २०१८ आणि २०१९ या वर्षांतील म्हणजेच सुमारे ५ वर्षांपूर्वीच्या बोगस घरपट्ट्या लावण्यात आल्या होत्या.
एकाच वेळी ही जुनी नोंदणी दाखवून शासनाची फसवणूक करण्याचा मोठा कट रचण्यात आला होता. या प्रकरणात सुरुवातीला १४ जणांवर गुन्हे दाखल करून ४ मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात ज्यांचा यात सहभाग आहे त्यांच्यावर दाखल केले असल्याचे नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले आहे.
गुंतवणूकदारांना आवाहन...
उभारण्यात आलेल्या २ हजार खोल्यांमध्ये जर कोणत्याही नागरिकाने किंवा गुंतवणूकदाराने पैसे गुंतवून खरेदी केली असेल, तर त्यांनी न घाबरता तक्रार नोंदवण्यासाठी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.