

कल्याण : डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकास प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर आता आणखी ३० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या उर्वरित कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, डोंबिवलीकरांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नवे नाट्यगृह उपलब्ध होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
डोंबिवलीला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे मोठे योगदान राहिले आहे. अनेक वर्षे नाट्यप्रयोग, संगीत मैफली, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्यिक उपक्रमांचे हे महत्त्वाचे केंद्र होते. मात्र, नाट्यगृहाची इमारत जीर्ण झाल्याने ते बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था आणि रसिकांची मोठी गैरसोय होत होती.
डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे आणि आधुनिक सुविधांनी युक्त असे नाट्यगृह पुन्हा उभे राहावे, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला. नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा आणि प्रकल्पातील कामे आर्थिक अडचणींमुळे रखडू नयेत, यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना आता यश आले असून, ४ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने शासन निर्णय जारी करून उर्वरित कामांसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
'महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद' या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या खर्चाचा संपूर्ण १०० टक्के हिस्सा राज्य शासन उचलणार असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका या कामाची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या उर्वरित कामांसाठी निधीची तरतूद झाल्याने प्रकल्पाला गती मिळण्यास मदत होणार आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्राला पुन्हा एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळणार आहे.
नाट्यप्रयोग, संगीत कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळे आणि विविध कलाविष्कारांसाठी कलाकारांना हक्काचे सभागृह उपलब्ध होईल, तर नाट्यरसिकांनाही नव्या सुविधांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.
डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठीही हे नाट्यगृह सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. त्यामुळे केवळ एका वास्तूचा पुनर्विकास नव्हे, तर डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेला नव्याने बळ देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला मिळालेल्या आर्थिक बळातून नाट्यगृहाची उर्वरित कामे मार्गी लागून डोंबिवलीकरांचे हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ लवकरच कलारसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
नव्या स्वरूपातील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची वैशिष्ट्ये...
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पुनर्विकास करून ते अत्याधुनिक सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये भव्य रंगमंच, उत्तम आसनव्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना आणि आकर्षक रंगसंगतीसह नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच छोटेखानी नाट्यप्रयोगांसाठी स्वतंत्र ड्रामा थिएटर, कलाकारांच्या सरावासाठी सराव कक्ष आणि कलाविष्कारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीसोबतच बाह्य परिसराची कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाट्यप्रेमी, कलाकार आणि रसिकांसाठी एक सर्वसमावेशक, आधुनिक आणि दर्जेदार सांस्कृतिक केंद्र डोंबिवलीत साकार होणार आहे.