

ठाणे : आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाचा पहिला दिवस रमा एकादशी, वसुबारस, गोवर्धन (५ नोव्हेंबर). यंदा ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारी दिवाळी ११ नोव्हेंबरपर्यंत दिनदर्शिकेत दिसत असली, तरी शनिवार (दि. ७) आणि सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी ‘खाडे दिवस’ असल्याने त्या दिवशी कोणतीही दिवाळीची तिथी नसल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज (गुरुवारी) रमा एकादशी, वसुबारस, गोवर्धन द्वादशी आहे, शुक्रवारी (दि. ६) धनत्रयोदशी, धन्वंतरीपूजन, यमदीपदान आहे. मात्र, शनिवारी (दि. ७) ‘खाडे दिवस’ आहे. रविवारी (दि. ८) नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी-कुबेरपूजन, अलक्ष्मी निस्सारण, महावीर निर्वाण आहे.
या दिवशी पहाटे ५.३८ वाजता चंद्रोदय आहे. तिथपासून सूर्योदयापर्यंत सकाळी ६.४३ वाजेपर्यंत अभ्यंगस्नान करावे. सायंकाळी ६ ते रात्री ८.३३ पर्यंत प्रदोषकाली लक्ष्मी- कुबेरपूजन करावे, असे आवाहन सोमण यांनी केले आहे. सोमवारी (दि. ९) सूर्योदयी कार्तिक शुक्ल प्रतिपदा नाही. म्हणून त्या दिवशी काही सण नाही.
मंगळवारी (दि. १०) बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, वहीपूजन, विक्रम संवत् २०८३ कालयुक्त संवत्सर प्रारंभ, महावीर जैन संवत् २५५३ प्रारंभ होणार असून, अन्नकूट, गोवर्धन पूजन आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. या दिवशी हिशेबाच्या नवीन वह्यांचे पूजन-लेखन करावे. बुधवारी (दि. ११) भाऊबीज आहे.
रविवारी (दि. ८) चंद्रोदयकाली आश्विन कृष्ण चतुर्दशी आहे म्हणून त्या दिवशी नरकचतुर्दशी आहे. त्याच दिवशी सकाळी ११.२८ वाजता चतुर्दशी संपून अमावस्या सुरू होते, त्याच दिवशी प्रदोषकाली अमावस्या आहे म्हणून त्याच दिवशी लक्ष्मीपूजन करायचे आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली.