भिवंडी : कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांना शनिवारी भिवंडी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे. त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात आता उलाढाली वाढणार आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांमध्ये निवडणूक निकालानंतर 18 जानेवारीच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार हाणामारी होत राडा झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे 51 जणांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेने विलास पाटील समर्थक 37 तर महेश चौघुले समर्थक 14 जणांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून विलास पाटील व मयुरेश पाटील हे फरार होते.
शनिवारी (7 फेब्रुवारी) रोजी भिवंडी माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा मयुरेश पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांचे 23 समर्थकांना तर महेश चौघुले यांच्या 3 अशा एकूण 26 जणांना भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयातून जामीन मंजूर झाले आहे. माजी महापौर विलास पाटील यांना जामीन मंजूर झाल्याने आता महापौरपदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपा यांना महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीच्या चार सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे विलास पाटील यांची भूमिका निर्णायक राहणार असून ते स्वतः आता शहरात दाखल होत असल्याने ते सुद्धा महापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे काँग्रेस भाजपा शिवसेना पाठोपाठ कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या परत येण्याने महापौर पदाची चुरस आणखी वाढणार आहे.