मनोज ताठे
खडवली: वासिंद येथील जिंदल क्रॉसिंग परिसरात सोमवारी (२१ सप्टेंबर) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास कसारा दिशेकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गर्दीच्या वेळेत लोकलच्या दरवाजांजवळ मोठी गर्दी होत असल्याने चढताना किंवा उतरताना प्रवाशांचा तोल जाण्याचा धोका वाढतो. अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे प्रवाशांना दरवाजाजवळ उभे राहण्याची वेळ येते. त्यामुळे काही क्षणांचा तोलही जीवावर बेतण्याची शक्यता असते.
विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. गर्दीच्या महिलांच्या डब्यांमध्ये दरवाजाजवळ होणारी कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसांत दिवा-मुंब्रा परिसरातही गर्दीच्या लोकलमधून महिला पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
गर्दीच्या वेळेत अतिरिक्त लोकल फेऱ्या, स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी तसेच प्रवाशांना सुरक्षितपणे चढता-उतरता यावे यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. दरम्यान, वासिंद येथील घटनेतील मृत महिलेची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.