भाईंदर: ठाणे जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवर वसलेली उत्तन, पाली व डोंगरी चौक आदी गावे परस्परांशी जोडलेली आहेत. येथील सुमारे 90 टक्के लोकं मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. सध्या या सर्व भागासाठी उत्तन-चौक जुना रस्ता हा एकमेव रहदारीचा मार्ग उपलब्ध आहे.
हा रस्ता अत्यंत अरंद असून येथील वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेता पाली बंदर येथील शांतीनगर ते डोंगरी चौक जेट्टी पर्यंत कोस्टल रोड निर्माण करण्याची मागणी पाली-उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ आयुक्तांकडे केली आहे.
केंद्र सरकार, राज्य शासनाच्या माध्यमातून सागरमाला योजनेंतर्गत रस्ते वाहतुकीला जलमार्गाचा रो-रो सेवेंतर्गत पर्याय शोधला आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या रस्ते वाहतुकीचे अंतर मोठ्याप्रमाणात कमी होऊन कमी वेळेत जलमार्गाद्वारे जलद प्रवास सुरु झाला आहे. असे असतानाही उत्तन येथील कोळीवाड्यांतील मच्छीमारांना अस्तित्वातील अरुंद रस्ते वाहतुकीमार्गेच प्रवास करावा लागत आहे.
येथील रस्ते जैसे थे असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. येथील डोंगरी-चौक हा डोंगराळ भाग असल्यामळ तेथे घाटसदृश एकच मुख्य रस्ता उपलब्ध आहे, डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना किनाऱ्यावर जाण्यासाठी सुमारे 100 ते 150 मीटर अंतर पायऱ्यांद्वारे पायपीट करावी लागते, ज्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
तसेच उत्तन परिसरातील मच्छिमार पावसाळ्यात किंवा वादळी परिस्थितीत आपल्या नौका सुरक्षित ठेवण्यासाठी डोंगरी-चौक जेट्टी परिसरात बोटी नांगरतात. त्यावेळी मच्छिमार, पर्यटक व व्यापारी वर्ग या सर्वांना एकाच अरुंद मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करावा लागतो, ज्यामुळे धोका व गैरसोय निर्माण होते. या सर्व बाबी विचारात घेता पाली बंदर शांतीनगर ते डोंगरी-चौक जेट्टी पर्यंत सागरी किनाऱ्यालगत कोस्टल रोड निर्माण करण्यात यावा.
वाहतुकीचा ताण कमी होणार
हा कोस्टल रोड निर्माण केल्यास किनारपट्टीचे संरक्षण होऊन येथील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच स्थानिक मच्छीमार व स्थानिक ग्रामस्थांसाठी सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होईल, याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा विकास होईल. यासाठी स्थळ पाहणी करून कोस्टल रोड लवकरात लवकर मंजूर करून बांधकामास मान्यता द्यावी, अशी मागणी पाली-उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ आयुक्तांकडे केली आहे.