

मिरा रोड: प्रेयसीवर नजर असल्याच्या संशयातून डाचकूल पाडा येथे राहणाऱ्या 43 वर्षाच्या व्यक्तीला त्याच्या ओळखीच्या इसमाने शुक्रवारी मध्यरात्री छातीमध्ये व डोळ्यात इस्क्रू ड्रायव्हर मारून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे काशीगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले आहे.
प्रकाश उल्हास वाळुंज (43) असे मयत इसमाचे नाव आहे. प्रकाश हा संत रोहिदास वेल्फेअर सोसायटी, डाचकूल पाडा, काशीगाव येथे राहत होता. तो टेम्पो चालक असून काशीगाव येथील नीलकमल नाका येथेच टेम्पो चालवत होता. एक महिन्यापूर्वीच त्याने त्याच्या बायको व मुलांना त्याच्या मूळ गावी वाळुंज, राजगुरुनगर, पुणे येथे पाठवले होते.
काशिमीरा परिसरातच राहणारा आरोपी सागर साळुंके (32) यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. सागर साळुंके याच्या प्रेयसीवर मयत प्रकाश याची वाईट नजर होती. त्यामुळे या रागातून त्याची हत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. त्या वादातून आरोपीने शुक्रवारी मध्यरात्री प्रकाश याच्या छातीत व डोळ्यात इस्क्रू ड्रायव्हरने वार करून त्याच्या हत्या केली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रकाश याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.