भाईंदर : उत्तनकर मच्छीमारांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या घाऊक मासळी बाजाराच्या प्रलंबित प्रश्नावर उत्तन वाहतूक मच्छिमार संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात मासळी बाजारासाठी भाईंदर पश्चिम, काशिमीरा व वरसावे या तीन ठिकाणांचा पर्याय निश्चित करण्यात आला. बैठकीत तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सध्या उत्तनकर मच्छीमार मासेमारी केलेली मासळी भाईंदर पश्चिमेकडील खाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विकतात. मात्र हा बाजार स्थानिक ऐवजी शहराबाहेरील मासळी विक्रेत्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे बाजाराच्या निश्चित वेळेचे पालन केले जात नाही. त्यांच्या सोयीप्रमाणे बाजार सुरू केला जातो, सणासुदीच्या काळात मनाप्रमाणे बाजाराची वेळ ठरविली जात असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात आला. त्याचा त्रास उत्तनमधील मासळी विक्रेते, टेम्पो, ट्रक चालक व व्यापाऱ्यांना होतो. याबाबत स्थानिक मासळी विक्रेत्यांकडून त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांच्या मनमानीत काहीच बदल होत नाही.
अनेक वेळा सर्व मच्छीमार संस्थांनी एकत्र येत कमिशन एजंट सोबत चर्चा करून वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न केला असता त्यात त्यांना रस नसल्याचे दिसून आले. यामुळे उत्तनकर मच्छीमारांनी बैठक आयोजित करून त्यात मासळी बाजार सुरु करण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. यामध्ये स्थानिक मासळी विक्रेत्यांनी नायगांव, भाईंदर आणि क्रॉफर्ड मासळी बाजारावरच का अवलंबून रहावे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तनसारख्या मोठ्या मच्छिमार क्षेत्रासाठी काशिमीरा, भाईंदर किंवा वरसावे परिसरात स्वतःचा घाऊक मासळी बाजाराचा पर्याय निश्चित करण्यात आला. त्यासाठी स्थानिक मच्छीमारांसह मासळी व्यापारी आदींचे फेडरेशन स्थापन करण्यासह सर्व स्थानिक मच्छीमार संस्था आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन योग्य जागेची निवड, चर्चा व नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थानिक मासळी विक्रेत्यांना अनेक फायदे मिळणार
संभाव्य घाऊक मासळी बाजार सुरु झाल्यास स्थानिक मासळी विक्रेत्यांना अनेक फायदे मिळणार असल्याचा दावा उपस्थित मच्छीमार संस्थांकडून करण्यात आला. त्यात सध्या कमिशन म्हणून करोडो रुपये बाहेरील कमिशन एजंटांकडे जातात; ते पैसे स्थानिक मासळी विक्रेत्यांकडे येतील. तसेच मिळणारे पैसे स्थानिक समाजाच्या विकासासाठी वापरले जातील. मासळी बाजाराची वेळ स्थानिक मासळी विक्रेत्यांच्या सोयीने आणि नियमानुसार निश्चित करता येईल.
वसईमासळी बाजाराप्रमाणेच उत्तन परिसरातील शेकडो महिला व युवकांना रोजगार उपलब्ध होईल. ट्रक व टेम्पोचे वाहतूक भाडे मोठ्या प्रमाणात कमी होईल. महिलांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागणार नाही. स्थानिक पतपेढ्या व बँकांना आर्थिक वाढीसाठी मोठा लाभ मिळेल. यावर बैठकीत सविस्तर चर्चा करून उत्तन-पाली परिसरातील मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःचे घाऊक मासळी बाजार सुरू करणे, काळाची गरज असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. बैठकीत माजी प्रभाग सभापती बर्नड डिमेलो, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष विन्सन बांड्या, उपाध्यक्ष फ्रेडी भंडारी, उत्तन जमातीचे सचिव डिक्सन डीमेकर, माजी अध्यक्ष माल्कम भंडारी, उत्तन सोसायटीचे सचिव बोना मालू यांच्यासह स्थानिक मच्छीमार उपस्थित होते.