माऊली pudhari photo
ठाणे

माऊली

॥ तत्त्वज्ञानानं दिलेली अमूल्य ”भेट ” ॥

पुढारी वृत्तसेवा

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई

यज्ञ, तप, आर्जव या सद्गुणांची ओळख करून घेताना आम्हाला हे लक्षात आले की; आम्ही आजपर्यंत ऐकीव गोष्टीवर किती अवलंबून होतो. “यज्ञ” म्हणजे त्याग, आहुती. यज्ञ म्हणजे समर्पण, प्रेम !!!! यज्ञ म्हणजे भक्ती !! यज्ञ म्हणजे निष्काम सेवा-उपासना !!! तप म्हणजे शरीर, मन, वाणी यावर नियंत्रण, इंद्रियांच्या विषय वासनांना (इच्छा) सकारात्मक आवर, जीवनाच्या अथांग महासागरातील तारणारी “होडी.” म्हणजे तप. आर्जव म्हणजे सर्व प्राणी-मात्रांवर निस्सीम प्रेम. सर्वांचा स्वीकार, सृष्टीला दिलेले आनंदमय आलिंगन. याविषयी गतलेखांत आपण चिंतन केलं. आज आपण अभ्यासणार आहोत, भारतीय अध्यात्मानं जगाला दिलेला एकमेवाद्वितीय सद्गुणांचा ठेवा.

॥ श्री ॥

हजारो वर्षं मानवी संस्कृती जीवनाचा अर्थ लावण्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रयत्न करत आहे. हे संशोधन, हा अखंड नंदादीप कशासाठी? फक्त जीवनातील आनंदाचा शोध घेण्यासाठी! पण, हा आनंद कशात आहे? तो प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर काय करावं लागेल? काय मिळाल्यावर सर्व सुखाचे आगर (स्थान) प्राप्त होणार ! याचा अभ्यास जगाच्या पाठीवर ग्रीक, इजिप्सियन, मेसोपिटीयन, चिनी संस्कृती करत आहेत. हा अखंड शोध खऱ्या अर्थाने पूर्ण केला, तो भारतीय “हिंदू संस्कृतीनं.” सिंधू नदीच्या काठावर , तत्त्वज्ञानाचं झालेलं जागरण, अखंड सृष्टीच्या कल्याणासाठी झालं! म्हणूनच त्याच श्रेष्ठत्व अधिक ठसठसीतपणे जाणवतं. हे तत्त्वज्ञान कोणा एक धर्म, संस्कृती, परंपरा, संप्रदाय यांचे न राहता ते मानवांसह अखंड विश्वाच्या कल्याणाचा स्त्रोत बनून समोर येतं, म्हणूनच त्याचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे.

पाश्चिमात्य विचारवंताना आणि तत्त्वज्ञान्यांना भरतखंडातील तत्त्वचिंतनाने अचिंबीत केले !!! खरं तर हे आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद!! पण, हा अभिमान आणि गौरव जगाच्या व्यासपीठावर आम्हाला घेऊ न जाता आला नाही, हेही आमचं दुर्दैवच !!! मुळात श्री संत विवेकानंदांचा अपवाद वगळता, आमच्या देशात एकही तत्त्ववेत्ता जन्माला आला नाही, की त्यानं जगाच्या विचारवंताना भारतातील तत्त्वज्ञानाच्या गाभ्यावर चिंतन करायला भाग पाडलं.

“अष्टांगयोग” किंवा राजयोगासारखं तत्त्वचिंतन, जे मुळात शिक्षण संस्कृतीचा भक्कम पाया आहे. मानवी जीवनमूल्यांच्या उपासनेची धरोहर आहे. मानवी जीवन विकासाचा मूलमंत्र आहे; सृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेणारं एक उत्तम साधन आहे. जीवन मुक्त होण्यासाठीचा राजमार्ग आहे. तोच “राजमार्ग” आम्ही जगासमोर आणला नाही, ना आमच्या पिढ्यान्‌‍ पिढ्यात ते सामर्थ्य आले!!!

गीता तत्त्वज्ञानातील अष्टांगयोग साधनेवर माऊली श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात फार सुंदर निरूपण करतात. यम-नियम-आसन-प्राणायम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी. हे अष्टांगयोग साधनेमधील आठ महत्त्वाची साधनं. या योग साधनेच्या सर्वात अग्रभाग “यम” हे साधन, त्याचे पाच उपप्रकार आहेत; ते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. याचाच अर्थ अष्टांगयोग साधनेच्या सर्वात अग्रभागी असणारं साधन म्हणजे-अहिंसा !!! या आठही साधनांवर आपण सहाव्या अध्यायाच्या चिंतनावेळी यथासांग विस्तृत मांडणी करत निरूपण केलं होतं. आज आपण “अहिंसा” या सद्गुण साधनावर सोळाव्या अध्यायात माऊलींनी टाकलेला प्रकाश अनुभवूयात.

आणि जगाचिया सुखोद्‌‍ देशें|

शरीर वाचा मानसें|

राहाटणें, ते अहिंसे| रूप जाण ॥

अहिंसा !!! अष्टांगयोग साधनेतील सर्वात महत्त्वाचं साधन. भारतीय अध्यात्मशास्त्रानं जगाला दिलेलं अमूल्य असे तत्त्व. या एकाच तत्त्वाभोवती जग अहोरात्र फिरत असते, त्याचं महत्त्व आहे. एवढंच नव्हे, तर क्षणाक्षणाला आम्ही अहिंसा तत्त्वाच्या सोबत जगत असतो. आमच्या जागृती-स्वप्नी आणि शिशुप्ती या तिन्ही आवस्थेत, श्वासा-श्वासासोबत साथ करणार, तत्त्व म्हणजे अहिंसा. हा लेख वाचणारा प्रत्येक वाचक नक्कीच या माझ्या विवेचनावर मनातल्या मनात हसत असणार आणि स्वतःला प्रश्न विचारणार - की, हे कसं शक्य आहे? हो, हे अगदी सत्य आहे की “अहिंसा” हे तत्त्व तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून ते आमच्या अंतिम क्षणापर्यंत आमच्या सोबत असते. सृष्टीतील सर्व चरा-चरांच्या उत्पत्तीपासून लयापर्यंत “अहिंसा” प्रत्येका सोबत असते. ती कशी ?

अहिंसा :- काया-वाचा-मनाने कोणाचीही विनाकारण हिंसा करू नये म्हणजे “अहिंसा” होय. शरीर-मन-वाचा हे तिन्ही तुमच्या माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ संगत करणारे घटक आहेत. या तिन्हींच्या माध्यमातून आम्ही सृष्टीतील मानवांसह सर्व घटकांशी क्षणाक्षणाला कोणता ना कोणता व्यवहार करत असतो. आमच्या सान्निध्यातील गोष्टींसह, आमच्या कक्षेच्या बाहेरील, शक्तीच्या बाहेरील गोष्टीवर आम्ही काया-वाचा-मनाने व्यक्त होत असतो. मनाने कोणाविषयी विनाकारण वाईट विचार करणे !!! शरीराराने कोणासही विनाकारण हानी पोहचविणे !!! वाणीने (बोलून) कोणा विषयी विनाकारण वाईट पद्धतीने व्यक्त होणे !! किंवा त्यांचा द्वेष (निंदा) करणे. या तीनही गोष्टी आपण क्षणाक्षणाला करतो की नाही? याविषयी आत्मचिंतन करा.

आता आपल्याला लक्षात येईल की, आपण दिवसभर, क्षणाक्षणाला काया-वाचा-मनाने “अहिंसेशी” किती घट्ट जोडलेलो आहोत. अहिंसा ही नित्याची बाब आहे आणि त्यामुळेच ती सत्याचीही बाब आहे. अहिंसेचा अर्थ लावताना कोणासही विनाकारण आपण “त्रास” देऊ नये असाच लावला की, मग आपणास त्रास देणाऱ्याविषयी “हिंसा” ही शास्त्रमान्य आहे, असाही अर्थ लागतो, ही बाब मी मुद्दामहून “अधोरेखित” करतो.

Also read:माऊली

माऊली अहिंसेबाबत फार सुक्ष्मपणे व्यक्त झालेली आहे. त्यांना अखंड विश्वाच्या कल्याणाची अहोरात्र काळजी तर आहेच शिवाय जग सुखात नांदावं हेच तर त्यांच्या जीवनाचं “साध्य” आहे. म्हणूनच ते म्हणतात जगाच्या सुखासाठी, शरीर (काया) वाचा (वाणी) आणि मनाने जो “अहिंसा” मार्गाने चालतो तोच खरा “अहिंसा स्वरूप” आहे. “अहिंसा” हा सद्गुण दिसायला फार सोपा असला तरी अंगीकारायला सर्वात कठीण आहे. क्षणाक्षणाला लोकांविषयी काया-वाचा-मनाने व्यक्त होणारे तुम्ही आम्ही, कशा पद्धतीने विचार करतो? याविषयी चिंतन करा. कोणाविषयी वाईट विचार जरी विनाकारण मनात आले तर ती “हिंसाच” आहे, हा किती महत्त्वाचा आणि संवेदनशील जीवनाचा भाग आहे.

आमचे इष्ट, मित्र, समाज, शेजारी, नातेसंबंधी, परिवार, स्नेही यांच्याविषयी आमचे वागणे कसे असावे याचे आत्मचिंतन करायला लावणारे तत्त्व म्हणजे “अहिंसा” राष्ट्र, संस्कृती, धर्म, जात, भाषा, प्रांत, परंपरा, रुढी, सत्ता, संपत्ती, संस्कृती, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण इ. क्षेत्रात आम्ही “अहिंसा” अंगीकारली, तर जगच नव्हे तर अवघे “विश्व” क्षणार्धात बदलेलं. हे त्रिवार सत्य !!! एवढी प्रचंड शक्ती, सामर्थ्य असलेले तत्त्वज्ञान म्हणजे “अहिंसा”.

अष्टांग योग साधनेतला मेरुमणी म्हणून उगाच भारतीय तत्त्वज्ञानानं या तत्त्वाला शिरपेचात खोवलेले नाही. हे तत्त्व आमच्या हिंदूसंस्कृतीचा “मुकुटमणी” आहे. जग त्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहाते हे नवलपूर्ण सत्य !!!! कारण आणखी जगाला “अहिंसा” कळलेलीच नाही !!!! ज्या दिवशी कळेल त्या दिवशी ज्ञानदेवांचं “पसायदान” भूतलावर अवतीर्ण होईल हे शाश्वत सत्य !!! - रामकृष्ण हरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT