

कृष्णा जाधव -मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
पाणी शुद्धच असते, घाण त्याबरोबर चालली की, आपण अत्यंत पवित्र पाण्यास “अशुद्ध पाणी” म्हणतो. हवा कधीच अशुद्ध नसते, आपण हवेत कृत्रिम पद्धतीने अनेक अशुद्ध घटक मिसळवतो आणि सर्वजण हवा “अशुद्ध” आहे असे म्हणतात. दोषी कोण? दोष कोणाला? काय आपण हे अत्यंत सहजतेने म्हणताना बुद्धी गहाण ठेवत नाहीत काय? अगदी त्याप्रमाणे “मन” कधीच अशुद्ध असत नाही, त्याला विचारांची जोड, साथ, संगत शुद्ध, अशुद्ध बनवते. इथेच “अभय” सद्गुणाचे महत्त्व समजून येते. जिथे “अभय” हा सद्गुण तिथे अहंकाराला बाजूला ठेवत “मनाला” सत्वविचारांचीच कास धरायला लावतो. जो मार्ग “सत्वशुद्धी” या सद्गुणांकडे थेट जातो. याविषयीचं चिंतन आपण गत लेखात केले. आजच्या लेखात पुढील सद्गुणांचा विचार करूयात.
॥ श्री ॥
“सत्वशुद्धी” या सद्गुणांचं विवेचन करताना माऊली म्हणतात, “संकल्प-विकल्प हे दोन्ही ज्या ठिकाणी उरले नाहीत, रजोगुण- तमोगुण हे दोन्ही ज्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत. निजधर्माची आवड भोगीत असता जे बुद्धीचे शुद्ध स्वरूप उरते तिलाच “सत्त्वशुद्धी” म्हणतात.
1)संकल्प म्हणजे काय?
मनाने केलेली इच्छा, विचार, घेतलेला प्राप्तीचा ध्यास, ठराव.
उदा:- हे करायचं, ते नाही करायचे, हे मिळवायचं, ते मिळवायचं. इत्यादी
2) विकल्प म्हणजे काय?
मनामध्ये निर्माण होणारे द्वंद्वात्मक विचार किंवा इच्छा. उदा :- बरोबर-चूक, आवड-नावड, माझं - तुझं याविषयी निर्माण होणारं द्वंद्ध. इत्यादीच.
“ज्या अवस्थेत मनात कोणताही विचारांचा प्रवाह नसतो, इच्छा नसतात, तुलना नसते, निर्णय नसतो - ती अवस्था म्हणजे संकल्प-विकल्प विरहित अवस्था.” या अवस्थेत मन पूर्णपणे शांत, विचाररहित असते, या अवस्थेत फक्त “शुद्ध जागरुकता” उरते, हीच निर्विकल्प “समाधी” अवस्था. ध्यान, जप, आत्मविचार, वैराग्य, सत्संग इ. साधनांचा अभ्यास करून “सत्वशुद्धी” प्राप्त करता येते.
माऊली सत्वशुद्धीची व्याख्या करताना एक शब्द फार हेतूतः वापरताना दिसतात. तो शब्द म्हणजे “निजधर्म”आवड भोगणे. प्रापंचिक व्यक्तींना सुद्धा “सत्वशुद्धी” प्राप्त करता येऊ शकते, हे या एका शब्दावरून कळते. हेच माऊलींचे इतर तत्ववेत्त्यांपेक्षा “वेगळेपण.” प्रपंचात राहूनही परमार्थ सहजसाध्य आहे. पारमार्थिक “बुद्धी” प्रपंचात “स्थिर” ठेवली तर, कर्म-ज्ञानेंद्रीयांसह, मन, बुद्धी, चित्त यांना प्राप्तकर्माठायी एकाग्र केले आणि अहंकारास मुठमाती दिली की, “सत्वशुद्धी” प्राप्त झालीच झाली.
“भोग” हा प्रापंचिकास सुटलेला नाही. ज्या प्रापंचिकाची “बुद्धी” अनन्यभावाने “एकनिष्ठ” होते तिथे “भोग” भोगताना आपोआप जागृकता निर्माण होणार आहे. जीवनात पावलोपावली ही जागृती सांभाळता आली पाहिजे. यानंतर पुढील सद्गुण आपणास पाहायचा आहे, जो सत्वशुद्धीचाच एक भाग आहे, असे वाटते.
ज्ञान-योग व्यवस्थित -
ज्ञानयोग हा सद्गुण प्राप्त करण्यासाठी ज्ञान किंवा योग या मार्गाचा अवलंब करावा लागतो. या दोन्ही मार्गाचं सखोल चिंतन आपण अध्याय दुसरा “ज्ञानयोग” आणि अध्याय सहावा “अष्टांगयोग” यामध्ये केलेले आहे. “विकल्परहीत होवोन ज्ञान अथवा योग या ठिकाणी स्थिर होणे यास ज्ञानयोग व्यवस्थित म्हणतात. यानंतर पुढचा सद्गुण “दान.”
दान :- काया-वाचा-मनाने यथाशक्ती “धनाने” “वंचना” न करता उपकार करणे यास “दान” म्हणावे.
आता देहावाचा चित्तें | यथा संपन्ने वित्तें |
वैरी जालियाही आर्तते| न वंचने जै का ॥
दान किती शुद्ध चित्ताने करावे, तर त्यास “दान”म्हणावे !!!
हे माऊलीवरील ओवीतून सांगतात. ज्याला मदत हवी आहे ती करताना चित्तात “वंचना” नसावी. आड-भाव किंवा त्याच्यापासून काही फायदा घेण्याचा इरादा करून केलेले दान हे “निष्फळ” असते. दान देत असताना तन-मन-वाचा याद्वारे देता येईल. पण, धनाचे दान करताना माऊली सावधपणे देण्याचा सल्ला देतात. “यथाशक्ती” प्रमाणे म्हणजे जे दान दिले असता आपल्या “धन” शक्तीवर फारसा परिणाम होणार नाही. आपल्याला सहजासहजी जेवढी संपत्ती मदत म्हणून देता येऊ शकते, याचा विचार करूनच दातृत्वाचा गुण अंगी बाळगा. “वैरी” असला तरी त्याने मदत मागितल्यावर वैरभाव विसरून दातृत्वशक्ती जागृत ठेवत केलेली “दान” पुण्य म्हणूनच ओळखली जाते. या सद्गुणांचा परिचय संसारिकांना ठिकठिकाणी, वेळोवेळी येतो. दानानंतर पुढचा सद्गुण आहे “दम”
“दम”-
“दम” म्हणजे “दमन” किंवा चौदा इंद्रियावर आणि त्यांच्या इच्छांवर निरंकुश सत्ता गाजवणे. सर्व इंद्रियांना आपल्या काबूत ठेवणे. विषय आणि इंद्रिये यांचा सातत्यपूर्ण अभ्यास करत इंद्रियांना आवडणाऱ्या प्रत्येक विषयाच्या स्वीकृतीस बुद्धीच्या निकषावर अभ्यास करून परवानगी देणे.
“दम” या गुणास परमार्थात आणि प्रपंचात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे इंद्रियाधिन होवोन व्यवहार करतात त्यांचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही लयास जातात. सकाळी झोपेतून उठल्यापासून , तो सायंकाळी झोपेपर्यंत प्रापंचिकास जे-जे कर्म लागते, त्या प्रत्येक कर्मातली अभिलाषा, कर्मातून प्राप्त करून घेण्याची इच्छा, जी काही असेल तिला अमर्याद होऊ देता कामा नये. जीवनात कोणतीही गोष्ट अति झाली की तिथेच तिच्या लयाचीही बिजे पेरली जातात. माणूस हा प्राणी इतिहासाकडून काहीच का शिकत नाही? याचं मला सातत्यपूर्ण आश्चर्य वाटतं !
उदा :- उत्कर्ष हा एका मर्यादेपर्यंत सुंदर दिसतो. चढण सुंदर असते, पण ती संपताक्षणी प्रचंड “दरी” समोर उभी असते. मला याठिकाणी गदिमांच्या गीतरामायणातील फार सुंदर ओळी आठवतात.
अंत उन्नतीचा पतनी होई या जगात |
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत ॥
वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा|
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.॥
“दम” धर जरा !! हा शब्द नेहमी कानी गाजत राहावा !!! हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फार प्रकर्षाने वापरतात. अशिक्षितांमध्ये या गुणांचा परिणाम सुशिक्षितांहून अधिक असल्यांचं आपणांस नित्याच्या व्यवहारात दिसेल. नवयुवकांना हा सद्गुण जीवनाची एक नाविण्यपूर्व दिशा देतो. म्हणूनच या गुणाचा नित्याने अभ्यास करावा. आपल्या इच्छांना लगाम लावता येणे, यासारखे दुसरे “वैराग्य” ते कोणते?
हल्ली तर या गुणांचं महत्त्व अधोरेखित करावं, असं अनन्यसाधारण आहे. स्पर्धेच्या युगात लोक मानवी भाव-भावनांवर माती टाकत, नात्यांना पायदळी तुडवत स्वार्थ लालसेपोटी, इंद्रिये इच्छेमागे धावत आपणास हवं ते प्राप्त करून घेण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडताना ठिकठिकाणी दिसतात !
वैयक्तिकच नव्हे, तर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय पटलावर “दम” या सद्गुणांचं महत्त्व एकमेवाद्वितीयच आहे. म्हणूनच तो सर्वांनी अंगीकारायला हवा. “दम” याविषयावर निरूपण करताना माऊली म्हणतात, सर्वेंद्रियांच्या द्वारावर “वैराग्यरूपी” प्रखर अग्नी पसरून ठेवावा, जेव्हा जेव्हा या दारास विषय प्रवृत्ती (इच्छा) येतील, तिथेच त्या जळून खाक होतील !
पुढील लेखात आणखी काही सद्गुणांचा अभ्यास करूयात.
- रामकृष्ण हरी