ठाणे : आपल्याच पत्नीचा खून करणाऱ्या आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या उल्हासनगर येथील आरोपी आनंद तुळशीराम सूर्यवंशी (60) याला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केली. हत्येनंतर तब्बल 8 महिन्यानंतर पोलीस पथकाने अटक करून ठाणे न्यायालयात नेले असता त्याला न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर-03 येथील मंडलिक चाळ परिसरात 9 मे रोजी मालमत्ता वादातून आनंद याने त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी (47) हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला होता. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी मोबाईल न वापरता विविध जिल्ह्यांत लपून राहत होता.
याचदरम्यान मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे यांना आनंद हा नाशिकरोड येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या पथकाने 6 जानेवारी रोजी सापळा रचून त्याला अटक केली. पुढील तपास उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस करत आहे.