

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती होत आहेत. माजी नगरसेवकांसह शिवसैनिकांनी थेट आव्हान दिल्यामुळे या लढतींकडे मुंबईचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीतही आदित्य ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपा-शिवसेना शिंदे गटाने मोठी ताकद लावली होती. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खासदार मिलिंद देवरा यांना उतरवण्यात आले होते. तरीही आदित्य ठाकरे निवडून आले. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून वरळीतील ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक दुखावले गेले आहेत. काहींनी तर थेट ठाकरेंच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. प्रभाग क्रमांक 196 मध्ये माजी नगरसेवक विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांची पत्नी पद्मजाप चेंबूरकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ठाकरेंचे दिवंगत माजी नगरसेवक मधुकर दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहे. 197 प्रभाग मनसेला सोडण्यात आल्यामुळेही येथील शिवसैनिक नाराज झाले असून माजी नगरसेवक परशुराम देसाई यांनी आपली मुलगी श्रावणी देसाई हिला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे.
प्रभाग क्रमांक 194 मध्येही विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसैनिक निवडणूक मैदानातच दिसून येत नाहीत. प्रभाग क्रमांक 199 मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील शिवसैनिक नाराज असून पूर्वीचे ज्येष्ठ शिवसैनिक राजेश कुसळे यांच्यासोबत अनेक शिवसैनिक शिंदे गटात गेले आहेत.
अटीतटीच्या लढती प्रभाग 196
- पद्मजा चेंबूरकर, शिवसेना ठाकरे गट
- मानसी दळवी, ठाकरे गट बंडखोर
- सोनाली सावंत, भाजपा
प्रभाग 197
- वनिता नरवणकर शिवसेना
- रचना साळवी, मनसे
- श्रावणी देसाई, ठाकरे गट बंडखोर
प्रभाग 194
- समाधान सरवणकर, शिवसेना
- निशिकांत शिंदे, शिवसेना ठाकरे गट
प्रभाग 198
- किशोरी पेडणेकर शिवसेना ठाकरे गट
- रूपल कुसळे, शिवसेना