उल्हासनगर : इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलाचा पत्र्यावर प्लॅस्टिक टाकताना विजेच्या प्रवाहाशी संपर्क झाल्याने विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयुष रॉय असे या मुलाचे नाव आहे तो बारावीत शिकत होता.
उल्हासनगर कॅम्प २ मधील शास्त्रीनगर येथील पंजाबी कॉलनी मधील ए टी पी शाळेजवळ रामचंद्र रॉय हे कुटुंबासह राहतात. हे त्यांच्या मुलगा आयुषसह आपल्या राहत्या घराच्या गळक्या पत्र्यावर प्लॅस्टिक टाकण्यासाठी चढले होते. त्यावेळी विजेच्या प्रवाहाशी आयुष याचा संपर्क झाला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
तत्काळ त्याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आरोप केला की, मंगळवारीच महावितरणकडे वीज तारेसंदर्भात तक्रार केली होती, तरीही कोणताही कर्मचारी घटनास्थळी आला नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.