

उल्हासनगर : उल्हासनगरात महापालिका शाळेच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे. मात्र हा हिरकणी कक्ष दारुच्या पार्टीसाठी वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लाइन परिसरात महापालिकेची शाळा क्रमांक 28 आहे. या शाळेच्या आवारात उल्हासनगर महापालिकेचे तीन हिरकणी कक्ष ठेवण्यात आले आहेत. यापैकीच एका कक्षात शुकवार (दि.28) रोजी दुपारच्या सुमारास काही इसम दारु पीत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता दारु पिणारे इसम तिथून पळून गेले होते. मात्र दारुच्या बाटल्या त्याच ठिकाणी सोडून गेले. दरम्यान हे इसम नेमके कोण होते? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून काही जणांच्या मते ते महापालिकेचे सफाई कामगार असल्याचं बोललं जात आहे.
शाळेच्या आवारात हा प्रकार सुरु असतानाही शाळा प्रशासनाला त्याची माहिती कशी नव्हती? शाळेला महापालिकेची सुरक्षा व्यवस्था नव्हती का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. शाळांमध्ये देखील विद्यार्थिनींबरोबर अनुचित प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाप्रसंगी उल्हासनगर मधील शाळांमध्ये दारुच्या पार्टी होत असल्याचे समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकार अतिशय घातक आहे. या या प्रकरणात त्वरीत कठोर कारवाई करण्यात यावी.
नरेश गायकवाड, राष्ट्रवादी.
उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करीत दारू पिणारे कोण महाभाग आहेत. ते शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.