उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडत मध्ये येणाऱ्या महापालिकेत काही मातब्बर नगरसेवकांवर आरक्षण बदलामुळे घरी बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच काही पत्ता कट झालेल्या जुना नगरसेवकांना पुन्हा पालिकेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुरुवारी टाउन हॉल येथे सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत काढण्यात आली. उल्हासनगर महापालिकेच्या 20 प्रभागांपैकी दोन प्रभाग त्रि सदस्य तर अठरा प्रभाग हे चार सदस्य आहेत. विशेष म्हणजे 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीतील नऊ प्रभागांची आरक्षण सोडत यंदा ही जैसे थे आहे. यामध्ये पॅनल 2, 3, 4, 5, 6, 12, 13, 16 आणि 19 चा समावेश आहे. मात्र पॅनल 1 आणि 18 मधील मातब्बर नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. तर पालिकेत येऊ इच्छिणाऱ्या भावी नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पॅनल एकमधील ‘ब’ जागा अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने गत निवडणुकीत रिपाइं (आठवले गट) तर्फे निवडून आलेले मंगल वाघे यांचा यावेळी राजकीय समीकरणांमधून पत्ता कट झाला आहे. मागील निवडणुकीत वाघे यांनी या जागेवरून विजय मिळवला होता. मात्र, या वेळी आरक्षण बदलामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणे अशक्य झाले आहे. नुकत्याच वाघे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पॅनल 1 मध्ये नव्या उमेदवाराच्या शोधाला वेग आला आहे.
पॅनल 9 हा तीन सदस्यीय असून, या पॅनलमध्ये पूर्वी नरेंद्रकुमारी ठाकूर नगरसेवक म्हणून कार्यरत होते. 2017 निवडणुकीत या जागेवर इतर मागासवर्गीय महिला आरक्षण लागल्याने त्यांच्या मुलगी डिंपल ठाकूर यांना संधी मिळाली आणि त्या नगरसेविका बनल्या. आता या पॅनलवर पुन्हा इतर मागासवर्गीय आरक्षण पडल्याने नरेंद्रकुमारी ठाकूर हे येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक 15 मधून अरुण अशान हे निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. चर्मकार समाजाचे प्रतिनिधी असलेले अरुण अशान हे अनुसूचित जाती आरक्षणातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. दरम्यान, पॅनल क्रमांक 15 (अ) ही जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठरल्याने त्यांच्या उमेदवारीचा मार्ग खुला झाला आहे. अरुण अशान हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे कार्यकर्ते असून, त्यांच्या पाठिंब्यामुळे या पॅनलवर शिंदे गटाची ताकद अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या युनियनचे पदाधिकारी असलेले राधाकृष्ण साठे हे पॅनल 17 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. ते मातंग समाजाचे असून पॅनल 17 मध्ये मातंग समाजाची ताकद आहे. या पॅनल मधील अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्वी महिलेसाठी आरक्षित होते. ते आता अनुसूचित जातीसाठी झाल्याने त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पॅनल 18 मधील आरक्षण बदलामुळे प्रमोद टाळे यांचा पत्ता कट
पीआरपी कवाडे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाळे यांना निवडणुक आरक्षण सोडतीत धक्का बसला आहे. मागील निवडणुकीत ते पॅनल क्रमांक 18 मधून इतर मागासवर्गीय आरक्षणावर निवडून आले होते. मात्र या वेळी त्या पॅनलमधील इतर मागासवर्गीय जागा महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे आता प्रमोद टाळे यांना सर्वसाधारण जागेवरून नशीब आजमवावे लागणार आहे.
माजी महापौर अपेक्षा पाटील परतणार निवडणुकीच्या रिंगणात
माजी महापौर अपेक्षा पाटील पुन्हा रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2017 ते 2019 या कार्यकाळात अपेक्षा पाटील या उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी कार्यरत होत्या. त्या वेळी त्या पॅनल क्रमांक 20 मधून इतर मागासवर्गीय महिला आरक्षणातून निवडून आल्या होत्या. यानंतर 2017 मध्ये महिला आरक्षण रद्द झाल्यामुळे त्यांचे पती विकास पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी पॅनल 20 मध्ये पुन्हा मागासवर्गीय महिला आरक्षण लागू झाल्याने अपेक्षा पाटील यांच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.