Election Strategy
उल्हासनगर : आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि टीम ओमी कलानी (टीओके) यांनी युतीची औपचारिक घोषणा केली असून या नव्या समीकरणाला ‘दोस्ती का गठबंधन’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र यामुळे भाजपला एकहाती सत्ता महापालिकेत आणण्याची स्वप्ने भंग पावली आहेत.
टीम ओमी कलानीच्या चार समर्थकांना भाजपने तीन दिवसांपूर्वी प्रवेश दिला होता. त्यामुळे भविष्यात भाजप आणि टिओके यांच्यात युती होण्याची शक्यता धूसर झाली होती. याचाच फायदा उचलत शिवसेना नेते टीम ओमी कलानीला शिवसेनेकडे वळवण्यात यशस्वी झाले आहेत. मागील विसर्जित महापालिकेत ह्याच गठबंधनाने सत्ता उपभोगली होती.
टीम ओमी कलानीच्या 21 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या लीलाबाई आशान ह्या महापौर झाल्या होत्या. त्यामुळे भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हाच प्रयोग करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना नेते राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंग भुल्लर, अरुण आशान, कुलवंतसिंग सोहता, टिओके नेते ओमी कलानी, सुमित चक्रवर्ती, मनोज लासी, कमलेश निकम, राजेश टेकचंदानी, संतोष पांडे, जयराम लुल्ला यांच्यासह माजी नगरसेवकांच्या उपस्थित घोषणा करण्यात आली. ती टीम ओमी कलानी हा नोंदणीकृत पक्ष नसल्यामुळे शिवसेनेच्या निशाणीवर निवडणूक लढवणार का असे विचारले असता कलानी समर्थक नगरसेवकांनी स्वतःचा पक्ष रजिस्टर केला असून त्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे मनोज लासी यांनी सांगितले. या दोस्तीचा गटबंधनमुळे आगामी निवडणुकीतील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.