

उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे शाखेने एका नायजेरियन डीलर सह पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 26 लाख 61 हजार रुपये किमतीची 131 ग्राम एम डी पावडर हस्तगत केली आहे.आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र रघुनाथ थोरवे यांना नेवाळी चौकाकडून कटईकडे जाणार्या रस्त्यावर एका महिलेकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, पोलीस अंमलदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, योगेश वाघ, शेखर भावेकर, सुरेश जाधव, मंगेश जाधव, रितेश वंजारी, प्रसाद तोंडलीकर, संजय शेरमाळे, विक्रम जाधव, रेवणनाथ शेकडे, मीनाक्षी खेडेकर, मनोरमा सावळे, कुसुम शिंदे, अविनाश पवार यांच्या पथकाने सापळा रचून बंद पडलेल्या एका ढाब्यासमोर कारवाई केली.
दरम्यान या गुन्ह्यातील चार पुरुष आरोपी हे नालासोपारा येथील राहणारे असून महिला ही मुंब्र्याची रहिवाशी आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे करत आहेत.
गुन्हा दाखल
या सापळ्यात एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या तपासणीत 71.03 ग्रॅम एम.डी. हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला आढळला. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. महिलेने अमली पदार्थ हा इम्रान हबीब खान याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी इम्रान खानलाही अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून हैदरअली जमील अहमद शेख, सिराज राजा शेख, चुक्स ऑगबोन्ना अजाह या तीन जणांना ताब्यात घेतले आहे.