ulhasnagar minor thieves steal ambulance shocking incident
उल्हासनगर : उल्हासनगरात राहणाऱ्या अभिजीत तिवारी यांच्या मालकीची रुग्णवाहिका चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. अभिजीत तिवारी हे कॅम्प 4 मधील लालचक्की परिसरातील साई सारथी अपार्टमेंट मध्ये राहतात. त्यांनी शिवनेरी रुग्णालय गेट जवळ रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही रुग्णवाहिका MH 05 R 0812 ही उभी केली होती आणि घरी जेवणासाठी गेले होते.
रात्री 3 वाजता एका पेशंटला रामरक्षा रुग्णालय येथून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी गेले असता, रुग्णवाहिका तिथे नव्हती. वॉचमनने सांगितले की कोणीतरी ती घेऊन गेल्याचे पाहिले होते. त्यामुळे रुग्णवाहिका चोरी झाल्याचे लक्षात येताच विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक व्यंकट दराडे, पोलिस अंमलदार रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड यांच्या पथकाने तत्काळ तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. काही तासांतच अंबरनाथ येथील हेरंब मंदिराजवळ चोरीस गेलेली रुग्णवाहिका शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. तपासात ही चोरी चार विधीसंघर्षित बालकांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली रुग्णवाहिका, एक बर्गमन स्कूटर आणि एक बुलेट मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. कोणत्या उद्देशाने या मुलांनी ही चोरी केली याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.