

उल्हासनगर: राज्य उत्पादन शुल्क विभाग उल्हासनगर विभागातर्फे मोठी कारवाई करत हरियाणा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या आणलेली विदेशी मद्याची तस्करी उधळून लावत ८७ हजार ३५० रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई उल्हासनगर कॅम्प ३ येथील डर्बी हॉटेलजवळील पेट्रोल पंप परिसरात करण्यात आली. या कारवाईदरम्यान, परराज्यातील म्हणजेच हरियाणा राज्यात विक्रीसाठी असलेला आयात विदेशी मद्यसाठा महाराष्ट्रात करचुकवेगिरी करत छुप्या मार्गाने विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे निरीक्षक बी. के. जाधव, दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील, उमेश गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक योगेश राणे, कर्मचारी शरद भोर, प्रशांत निकुंभ, मयुर तायडे, मंदार निजापकर यांच्या पथकाने सापळा रचून नविन रमेशलाल लुंड आणि पंकज सुनिल तेजवाणी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी मद्याचा एकुण 87 हजार 350 रुपये साठा मिळुन आला आहे.