

उल्हासनगर : येथील ट्रॅव्हल्स कंपनीत वाहन चालक म्हणून काम करणारे चंद्रकांत भगवान भोईर यांच्यावर पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी गाडीचा हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून हल्ला केला. या हल्ल्यात चंद्रकांत भोईर यांच्यासह त्यांचे सहकारी गणेश वाघे आणि मदतीला धावलेले दुसरे बस चालक राजू पांढरे हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यातील चंद्रकांत यांची प्रकृती चिंताजनक आहे.
कल्याण तालुक्यातील वसंत शेलवली या गावचे रहिवासी असलेले चंद्रकांत भोईर हे संजीवनी ट्रॅव्हल्स या कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. आज पहाटे साडेतीन वाजता ते पडदा येथील ॲमेझॉन कंपनीच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी बस घेऊन निघाले होते. त्यांच्यासोबत सहकारी गणेश वाघे होते. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्यांच्या बससमोर अचानक एक नंबर प्लेट नसलेली दुचाकी आली. या दुचाकीवर आनंद इंगळे, अश्विनी ससाने आणि त्यांचा एक सहकारी असे तिघे होते.
बससमोर अचानक दुचाकी आल्यामुळे चंद्रकांत यांनी हॉर्न वाजवला. याचा राग मनात धरून दुचाकीस्वारांनी शिवीगाळ करत बस फॉलोवर लाईन चौकात थांबवून चंद्रकांत आणि गणेश यांना बसमधून खाली उतरवून मारहाण केली. त्या वेळी घटनास्थळी पोहोचलेले दुसऱ्या बसचे चालक राजू पांढरे यांनी हस्तक्षेप करत दोघांची मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही मारहाण करण्यात आली.
या झटापटीत चंद्रकांत भोईर यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी हरवली. हल्ल्यामुळे तिघांच्याही डोक्यावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. हे उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात जात असताना अनिल अशोक सिनेमाजवळ पुन्हा 10 ते 15 जणांच्या टोळक्याने तिघांवर हल्ला चढवला. राजू पांढरे यांनी त्वरित 100 नंबरवर संपर्क साधत मध्यवर्ती पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना वाचवत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.
मात्र चंद्रकांत भोईर आणि राजू पांढरे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरूनच मध्यवर्ती पोलिसांनी आनंद इंगळे या सराईत गुंडाला ताब्यात घेतले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आनंद इंगळे, अश्विनी ससाने आणि त्यांच्या अज्ञात सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी आनंद इंगळे याला अटक केली आहे.