Ulhasnagar Municipal Corporation news
उल्हासनगर : तब्बल चार वर्षे प्रशासकीय सत्तेखाली असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेत अखेर लोकनियुक्त नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. निर्विरोध निवडीनंतर मंगळवारी (दि. ३) महापौर व उपमहापौरांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारताच महापालिकेच्या राजकारणात स्थैर्य आले. शहराच्या रखडलेल्या विकासाला आता गती मिळेल, अशी ठाम अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अश्विनी निकम यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला.
उल्हासनगर महानगरपालिकेत मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निर्विरोध निवडीनंतर पदभार स्वीकारण्याचा औपचारिक सोहळा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शिवसेना (शिंदे गट) यांच्या अश्विनी कमलेश निकम यांनी महापौर पदाचा, तर भारतीय जनता पक्षाच्या अमर लुंड यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला. हा सोहळा उल्हासनगर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम वेळेपर्यंत कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे न आल्याने ही निवडणूक निर्विरोध झाली होती. त्यामुळे निवड प्रक्रियेला कोणताही वाद न होता सर्वसम्मतीने नवे नेतृत्व निश्चित झाले.
पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम आणि उपमहापौर अमर लुंड यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधांच्या कामांना गती देणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच प्रशासनाशी समन्वय साधून पारदर्शक व गतिमान कारभार राबवण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा उपस्थित राहून नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना - भाजपा - साई पार्टी - टीम ओमी कलानी - वंचित बहुजन आघाडी - रिपाई - पीआरपी महायुतीमुळे शहराच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. शहराच्या विकासासाठी शिवसेना महायुती कायम कटिबद्ध आहे असा विश्वास यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार कुमार आयलानी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपचे राजेश वधारिया, टीम ओमी कलानीचे ओमी कलानी, साई पार्टीचे जीवन इदनानी, शिवसेनेचे अरुण आशान, राजेंद्र चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.