

उल्हासनगर : शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांचा उल्हासनगर मध्ये एकत्र महापौर बसणार अशी चर्चा असतानाच शिवसेनेने 40 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे करत महापौर शिवसेनेचाच बसणार यावर शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी शिवसेनेने गटनेतेपदी अरुण आशान यांची नेमणूक केली आहे.
उल्हासनगर महापालिकेत गट बनवण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. शिवसेनेचे 36, साई पक्षाचा 1, अपक्ष 1 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 अशा एकूण 40 नगरसेवकांनी एकत्र येत ‘उल्हासनगर शहर विकास आघाडी’ या नावाने अधिकृत गट नोंदणी केली आहे.
या घडामोडीमुळे महापालिकेत सत्तास्थापनेचा मार्ग जवळपास स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार धनंजय बोडारे यांचा धक्कादायक पराभव करणारे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अरुण अशान यांची शिवसेनेकडून गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याशिवाय काँग्रेसच्या एका नगरसेवकाने या गटाला बाहेरून समर्थन जाहीर केल्याने उल्हासनगर शहर विकास आघाडीचा आकडा 41 वर पोहोचला आहे. त्यामुळे बहुमताचा 40 चा आकडा पार करत या आघाडीने सत्तेवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
दुसरीकडे भाजपकडे केवळ 37 नगरसेवक उरल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. निवडणूकपूर्व गणिते वेगळी असली तरी अंतिम टप्प्यावर घडलेल्या या राजकीय समीकरणांमुळे उल्हासनगर महापालिकेतील सत्तेचे चित्र पूर्णपणे बदलले असून, आगामी कारभारावर उल्हासनगर शहर विकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले आहे.