

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या सत्ताकारणात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळत असून निवडणूक एकमेकांविरोधात लढवलेल्या शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष अखेर सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यानुसार शिवसेनेकडून कालानी गटाच्या अश्विनी कमलेश निकम यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपकडून अमर लुंड यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे इतर पक्षांबरोबर मिळून 40 हे बहुमत एकत्र केले. भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही पक्ष परस्पर विरोधात निवडणूक लढवली. निवडणूक निकालानंतर हे दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थितीत एकत्र येणार नाहीत, अशी चर्चा सुरू होती. मात्र राज्यस्तरावर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार उल्हासनगर महापालिकेत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
उल्हासनगर महापालिकेचे एकूण संख्याबळ 78 नगरसेवकांचे असून सत्तास्थापनेसाठी 40 नगरसेवकांचे बहुमत आवश्यक असते. सुरुवातीला शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्नशील होते. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला होता. मात्र दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतल्याने बहुमताचा प्रश्न सुटला असून सत्ता स्थापना निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी नंदू परब, शशिकांत कांबळे, राजेश वधारिया, जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी, नाना बागुल, अरुण अशान आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौरपदासाठी अश्विनी निकम आणि उपमहापौर पदासाठी अमर लुंड यांचेच एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने येत्या 3 तारखेला महापौरपदाचा निकाल बिनविरोध जाहीर होणार आहे. युतीमुळे सत्ताधारी बाकांवरील चित्र स्पष्ट झाले असून आता उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षात कोणाची भूमिका राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेला समर्थन दिलेल्या वंचित विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांची भाजप बरोबर युती झाल्यामुळे कोंडी झाली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता आमची युती भाजप बरोबर नसून शिवसेने बरोबर आहे. त्यांनी आम्हाला दिलेल्या शब्द ते नक्कीच पाळतील.