उल्हासनगर : उल्हासनगरातील श्रीराम चौक परिसरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसिटा यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या थरारक हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी अजय बागुल याला अटक केली आहे.
दहा दिवसांपूर्वी वसिटा कॉलनी गेटसमोर काही युवक उभे होते. तुलसी वसिटा यांनी त्यांना तेथून हटण्यास सांगितले असता वाद निर्माण झाला. दरम्यान, जुन्या वैमनस्यातून आरोपी अजय बागूल घटनास्थळी आला आणि वसिटा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लोखंडी कोयता काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने वसिटा यांनी तत्काळ बचाव केला आणि ते थोडक्यात वाचले. या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अजय बागूल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलीस हवालदार सुजित निचिते यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी उल्हासनगर कॅम्प 4 मधील सूर्य लॉजच्या पाठीमागे बिस्किट कंपनीजवळ येथे असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुजित निचिते, हरिश्चंद्र घाणे, पोलीस शिपाई सुनील गावित, प्रदीप बुरकुल, हनुमंत सानप आणि मंगेश वीर पथकाने सापळा रचत आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.