

नरेंद्र येरावार
उमरी: उमरी शहरातील अब्दुलापूरवाडी रस्त्यावर असलेल्या एका दारू दुकानदाराची मोटरसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी बॅग हिसकावून साडेतीन लक्ष रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस तपासाला वेग आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी लवकरच ताब्यात येतील असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील अब्दुलापूरवाडी रस्त्यावर देशी दारूचे दुकान आहे. दररोज प्रमाणे दुकानदार पंदेरीला रघु व्यंकटराजम गौड (६२) रा. नारायणपूर आंध्र प्रदेश हे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दारूचे दुकान बंद करून बाजूलाच असलेल्या गल्लीतून पैशाची बॅग घेऊन जात होते. दरम्यान त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलवरून तीघे जण येऊन त्यांची साडेतीन लाख रूपये रोख असलेली बॅग हिसकावून घेऊन पसार झाले.
घटना घडतात सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस कर्मचारी सुनील कोलबुद्धे, अरविंद हैबतकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेतला. परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी मंगळवारी देण्यात आलेल्या तक्रारीवरुन उमरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे.