

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील घरफोडी निजामपूर पोलिसांनी उघडकीस आणली. याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून चार लाख 29 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शांताराम गोरख पाटील (रा.बळसाणे) हे 18 ते 19 सप्टेंबरदरम्यान नाशिक येथे धार्मिक विधीसाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा उचकटून घरफोडी केली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयित अजय बापू कोळी, मुकेश पावबा धगर आणि दीपक पंडित शिरसाठ (सर्व रा.बळसाणे,ता.साक्री) यांची नावे निष्पन्न केली. संशयितांना मुंबईतून परतताना रायपुरबारी येथे 1 ऑक्टोबरला रात्री दोनच्या सुमारास पकडले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक एस.आर.बांबळे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भामरे, प्रियदर्शनी थोरात,चंद्रकांत गायकवाड,मधुकर सोमोसे, यशवंत भामरे,पाटील, रुपसिंग वळवी,प्रदीपकुमार आखाडे,नारायण माळचे, आर.यू.मोरे,प्रशांत ठाकूर, दीपक महाले,राकेश बोरसे, गौतम अहिरे,परमेश्वर चव्हाण,शरद पाटील,टिलू पावरा,मुकेश दुरगुडे,श्रीराम पदमर,मनोज माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.