ठाणे

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात एमडी विक्रीचे नेपाळ कनेक्शन उघड

२३८.५ ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उल्हासनगर कॅम्प ३ येथील रामकिसन करोतीया नगर परिसरात कारवाई करत ३ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे २३८.५ ग्रॅम एमडी (अमली पदार्थ) जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी फरार असून, त्यामधील एक आरोपी नेपाळमधून एमडी पावडर विक्रीसाठी पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

उल्हासनगर परिमंडळात मागील महिन्याभरापासून अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केले आहे. सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार समीर सुनील गायकवाड, रोहित बनगे आणि हरेश्वर चव्हाण हे या पथकात कार्यरत आहेत.

या पथकातील पोलीस अंमलदार समीर गायकवाड यांना उल्हासनगर कॅम्प तीनमधील 'सी' ब्लॉक परिसरातील गुलशन-ए-बगदाद मशिदीजवळील एका गाळ्यात एमडी पावडरची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक (प्रशासन) शीतल बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस अंमलदार जितेंद्र चौधरी, सुभाष सूर्यवंशी, अनिल घुले, प्रशांत धुडे यांच्या पथकाने अमली पदार्थ विरोधी पथकासह रात्रीच्या सुमारास रामकिशन करोतीया नगरमध्ये छापा टाकला.

पोलिसांनी सापळा रचून रेहान मुख्तार अहमद शेख (३८, रा. अशोकनगर, वालधुनी, कल्याण) आणि अरबाज मतिउर रहेमान खान (१९, रा. उल्हासनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २३८.५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या प्रकरणातील फरार दोन आरोपींचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे करत आहेत. दरम्यान, अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT