Raj Thackeray vs BJP : राज ठाकरेंना डिवचले! भाजप जिल्हाध्यक्षांची जीभ घसरली; डोंबिवलीत मनसे विरुद्ध भाजप वाद पेटण्याची चिन्हे

उत्तर भारतीयांच्या मंचावरून राज ठाकरेंवर निशाणा
raj thackeray vs BJP brij bhushan controversy
Published on
Updated on

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यात उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून झालेला जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच वादाचा संदर्भ देत भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

डोंबिवलीत 'उत्तर भारतीय विकास आघाडी'च्या एका कार्यक्रमात हिंदी भाषिकांना संबोधित करताना परब यांनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि मनसेमधील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर २०२२ मध्ये मनसे आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळाला होता. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. या वादामुळे तत्कालीन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

याच घटनेचा दाखला देत नंदू परब यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटले, "मी ब्रिजभूषण सिंह यांना सलाम ठोकतो. त्यांनी एकच आव्हान दिले होते की, उत्तर प्रदेशात येऊन दाखव; पण राज ठाकरे तिथे गेले नाहीत. एका उत्तर भारतीयाने आपली ताकद काय असते ते दाखवून दिले."

राज ठाकरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर स्थानिक व राज्याच्या विविध मुद्द्यांवरून मनसेने अनेकदा सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमुळे भाजप आणि मनसेत आधीच अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी जाहीर व्यासपीठावरून राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळात या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news