उल्हासनगर : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मागील सहा महिन्यांपासून घडत असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील घरफोडी व वाहन चोरीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे आणि मंगेश जाधव यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान लक्कीसिंग गब्बरसिंग टाक आणि कृष्णा शंकर शर्मा यांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय काजारी, श्रीरंग गोसावी, अशोक पवार, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, रितेश वंजारी,
मंगेश जाधव, शेखर भावेकर, सतीश सपकाळे, अमर कदम तसेच पोलीस शिपाई अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले, नितीन बैसाणे आणि अविनाश पवार यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व-पश्चिम तसेच अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरीचे एकूण 10 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांमध्ये
घरफोडी करून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अटक आरोपी लक्कीसिंग टाक हा घरफोडी प्रकरणातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर तसेच कर्नाटक राज्यात मिळून एकूण 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.